अहिल्यानगर: कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच कांद्याला रास्त हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज, गुरुवारी जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर ) येथील अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) रास्तारोको आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याला तातडीने हमीभाव जाहीर करावा, निर्यातबंदी हटवावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, थकीत वीजबिले माफ करावीत तसेच पीकविम्याचा लाभ तत्काळ द्यावा, सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा रवींद्र राजदेव यांनी यावेळी बोलताना दिला.
आंदोलनामुळे कल्याण महामार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद पडली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पारनेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडून स्वीकारण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रास्ता रोको आंदोलनावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी तातडीने रस्ता मोकळा करून दिल्याने रुग्णवाहिका तातडीने तेथून सुखरूप रवाना झाली.
आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी दीपक लंके, सोनिया राजदेव, सतीश भालेकर, सरपंच प्रकाश गाजरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, शशिकांत आंधळे, संदीप मत, लखन ठाणगे, जालिंदर लंके, विक्रम काळे, विश्वास शेटे, सरपंच शिवाजी निमसे, पोपट गुंड, संदीप ठाणगे, सरपंच अभिजित झावरे, प्रकाश राजदेव, भाऊसाहेब चौधरी, भानुदास आग्रे, बाळासाहेब चिकणे, संतोष चिकणे, साहेबराव चिकणे, शिवराम चिकणे, रामभाऊ थोरात, सरपंच बापू ठुबे, आयुब हवलदार, गंगाराम चिकणे, रामदास साळवे, बापू नरड, पोपट नरड, राजेंद्र शेरकर, विकास दगाबाज, जयवंत वाळुंज आदी सहभागी झाले होते.
