लोकसत्ता वार्ताहर

डहाणू/ कासा: डहाणू तालुक्याच्या टोकावरील किन्हवली येथे मे २०२३ मध्ये काम पूर्ण झालेल्या किरमिरा पुलाच्या जोड रस्त्याचा काही भाग पहिल्याच पावसात खचल्याचा प्रकार समोर आला आहे. नव्याने तयार केलेल्या या रस्त्याला भराव खचून भगदाड पडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान खचलेल्या भागात तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नाबार्ड योजने अंतर्गत सायवन-किन्हवली-किरमीरा या राज्यमार्गावरील लहान पुलांच्या बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी एक कोटी ७७ लाख ८० हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. मार्च २०२२ मध्ये ठेकेदाराला कामाचा कार्यादेश देण्यात आला होता. कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर १२ महिन्याच्या आत पुलांचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम उशिराने मे २०२३ मध्ये काम पूर्ण झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

आणखी वाचा-लग्नाच्या नाचगाण्यावेळी केलेल्या गोळीबारात तरुण जखमी

पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दीड-दोन महिन्यांच्या आत पुलाची दुरावस्था झाली असून पहिल्याच पावसात पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्याचा भराव खचून पाण्यात वाहून गेल्याचे निदर्शनास आले. जोड रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतर लगेचच त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र ही दुरुस्ती नाममात्र असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून मुसळधार पाऊस आल्यास ही भरणी पुन्हा पाण्यासोबत वाहून जाणार असल्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

नव्याने उभारण्यात आलेल्या पुलंच्या जोड रास्तचा काही भाग पावसा मुळे खचला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्य केले आहे. या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.