Parth Pawar Post On Sunil Tatkare And Praful Patel: गेल्या काही दिवसात घडत असलेल्या वेगवान घडामोडींमुळे राष्ट्रवादीचे (अजित पवार) कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोघांच्या भूमिकेबाबतही विविध सवाल उपस्थित केले जात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना पटेलांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळेही सर्वांच्या भुवया उंचावल्या. पण, याबाबत आता अजित पवारांचे पुत्र, राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पटेल-तटकरे विरोधातील बातम्या निराधार – पार्थ पवार
पार्थ पवार यांनी एक्सवर पटेल आणि तटकरे यांच्याबाबत एक पोस्ट केली आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार आणि काल्पनिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना अशा वादांमध्ये ओढणे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पार्थ पवारांनी काय पोस्ट केली आहे?
“प्रफुल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांना लक्ष्य करुन त्यांच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार आणि काल्पनिक आहेत. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची अनेक दशकांची निष्ठा आणि नेतृत्व आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना काल्पनिक वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, निषेधार्ह आहे”, अशी पोस्ट पार्थ पवार यांनी केली आहे.
रोहित पवारांचे आरोप
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पटेल आणि तटकरे यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप रोहित पवारांनी केला होता. अजित पवारांच्या निधनानंतर १८ दिवसांत पटेल, तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून, पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली होती. कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना सर्व अधिकार देण्याची त्यात मागणी केली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला होता.
सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला परस्पर पाठवलेल्या एका पत्राने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये २८ जानेवारी रोजी मृत्यु झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी २६ फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली. दरम्यान, पक्षाच्या वतीने सुनेत्रा पवार यांनी १० मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये २८ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यानचा पत्रव्यवहार अधिकृत धरला जाऊ नये, असे म्हटले आहे.
