Prashant Kishor Ajit Pawar NCP: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी काम करणार अशा आशयाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात बैठक पार पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर यासंबधित दावा केला जाऊ लागला. निलेश अरोरा यांच्यानंतर प्रशांत किशोर राष्ट्रवादीची रणनिती ठरवतील असा दावा विविध वृत्तांच्या माध्यमांतून केला जात आहे. याबाबत आता खुद्द पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले असून, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? याचा खुलासा केला आहे.

पार्थ पवारांनी खोडून काढला दावा

राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर राष्ट्रवादीबरोबर काम करणाऱ्या असल्याचा दावा खोडून काढताना, त्यांना घरी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केल्याचे सांगितले. किशोर यांनी राजकीय सल्लागार क्षेत्रातून निवृत्ती घेऊन आता काही वर्षे झाल्याचेही पार्थ पवारांनी एक्स या समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. आम्ही एकमेकांसाठी नेहमीच खंबीरपणे उभे आहोत आणि भविष्यातही एकमेकांसाठी आवश्यक असेल तिथे तत्पर राहू, असे पार्थ या पोस्टमध्ये म्हणाले.

नक्की काय म्हणाले पार्थ पवार?

“प्रशांत किशोर आमचे स्नेही असून माझ्या बंधूसमान आहेत. दादांच्या काळापासून आमचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. काल ते शहरात आले होते, त्यामुळे त्यांना आमच्या घरी भोजनासाठी आमंत्रित करण्याचा आणि त्यांच्याशी अभ्यासपूर्ण चर्चा करण्याचा आनंद मिळाला. ​राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम करण्याबाबत होत असलेल्या चर्चांवर मी स्पष्ट करू इच्छितो की, माझ्या माहितीनुसार, त्यांनी राजकीय सल्लागार क्षेत्रातून निवृत्ती घेऊन आता काही वर्षे झाली आहेत. भविष्यातही यात काही बदल होईल असे मला वाटत नाही”, असे पार्थ यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विविध दाव्यांनंतर स्पष्टीकरण

प्रशांत किशोर आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी राजकीय सल्लागार म्हणून काम करणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी यापूर्वी डिझाईन बॉक्सड् या कंपनीच्या निलेश अरोरा यांनी काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेली राष्ट्रवादीची गुलाबी जॅकेट ही संकल्पना अरोरा यांचीच असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आता अरोरा यांच्यानंतर प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी सल्लागार म्हणून काम करणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खुद्द पार्थ पवारांनी या चर्चांवर पडदा टाकला आहे.