कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सावंतवाडी-दिवा रेल्वे दादर, ठाणे अशा रेल्वे स्थानकापर्यंत न्यावी, अशी सुरुवातीपासून असणारी कोकणवासीयांची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे फळाला येईल, अशी अपेक्षा आहे. कोकणातील हंगामातील फणस, आंबे आणि दिवाळीतील पोहे घेऊन दहा वर्षांपेक्षा जास्त काळ सामान्य प्रवासी मुंबईला जाताना कसरत करत आहे. त्यातून सुटका होईल, अशी प्रवाशांना अपेक्षा आहे.
कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी सावंतवाडी ते दिवा आणि दिवा ते सावंतवाडी अशी रेल्वे पॅसेंजर सुरू झाली. सावंतवाडी शेवटचा थांबा असला तरी रेल्वे स्थानकावरील पायाभूत सुविधांअभावी ही रेल्वे मडगावपर्यंत जात आहे. त्यामुळे गोवा राज्यातून अगोदरच प्रवासी या रेल्वेत बसून घेतात.
सावंतवाडी-मळगाव रोड स्थानकावर टर्मिनस होत असल्याने दिवा-सावंतवाडी या ठिकाणीच थांबेल असे बोलले जात आहे. पण सुमारे दहा वर्षांपेक्षा जास्त काळ कोकणातील चाकरमानी, शेतकरी या पॅसेंजर गाडीने प्रवास करताना कसरतच करत जात आहे.
सावंतवाडी ते दिवा अशा धावणाऱ्या या पॅसेंजर गाडीच्या डब्यांची संख्या १७ आहे, ती दिव्यापर्यंत जात असते. पण खेड, रोहय़ामध्ये या गाडीतील हाऊसफुल गर्दी नंतर दगडफेक किंवा भांडणात रूपांतरित होते. हा अधूनमधून घडणारा प्रकार हायफाय, व्हीआयपी, खासदार, आमदार, मंत्री असणाऱ्या प्रवाशांना कळत नाही. त्यामुळे या कोकणातील खऱ्या अर्थाने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशाला क्लेशदायकच ठरतो.
कोकणातील चाकरमानी हंगामानुसार फणस, आंबे, दिवाळीत पोहे अशा कोकणातील विविध खाद्यवस्तू किंवा चाकरमानी कुटुंबासाठी साहित्य घेऊन जात असतो. पण त्यांना दिवा स्थानकावर उतरावे लागते. त्यानंतरचा पुढचा प्रवास धकाधकीचाच ठरतो. या गाडीने दिवा ते सावंतवाडी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही धकाधकीचा अनुभव येतो. त्यामुळे कोकणातील सामान्य प्रवाशांची फरफटच होत असते.
सावंतवाडी-दिवा रेल्वे ठाणे, दादर, कुर्ला, नेहरूनगर अशा कोणत्या तरी एका स्थानकापर्यंत गेल्यास पुढचा प्रवास लोकल रेल्वेतून करण्यास सुलभ होईल, अशी अपेक्षा ठेवून दिवा पॅसेंजर सुरू झाल्यापासून मागणी होती. पण या मागणीसाठी आपल्या हक्काचा माणूस नव्हता. पण आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हक्काचे, कोकणचे सुपुत्र असल्याने ही मागणी मान्य होण्यास विलंब लागणार नाही, अशी खात्री कोकणवासीयांना वाटते.
सावंतवाडी-दिवा, दादर, कुर्ला, नेहरूनगपर्यंत सोडण्यात यावी ही मागणी दिवा पॅसेंजर सुरू झाल्यापासूनच आहे. आता ही रेल्वे मुंबईपर्यंत गेल्यास रेल्वे डबेही वाढविणे आवश्यक आहे. दिवा पॅसेंजर सतरा डब्यांची धावत आहे. ती किमान २३ डब्यांची धावू शकते. त्यामुळे आणखी सहा डबे पाठविले तर प्रवाशांची गैरसोय होणार नाही. मुंबईत रेल्वे जाईल तेव्हा या गाडीला पॅसेंजर गर्दी करतील अशी अपेक्षा आहे.
सावंतवाडी-दिवा सावंतवाडीपर्यंत असली तरी ती पुढे गोव्यात जाते. पण दादर-सावंतवाडी राज्यराणी मात्र सावंतवाडीला थांबत आहे. या गाडीला १२ डबे आहेत. ही गाडीही किमान २० डब्यांची धावली तर कोकणातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही. राज्यराणीचे डबे वाढविण्याची मागणी आहे.
दिवा आणि राज्यराणी या दोन गाडय़ा सोबतच जनशताब्दी एक्स्प्रेसला डबे वाढवून थांबे देण्याची पुनर्रचना झाल्यास कोकणातील प्रवाशांना गर्दीच्या काळातही कोंबून प्रवास करावा लागणार नाही, असे वाटते. आज कोकणकन्याचे वेटिंग लिस्ट पाहता राज्यराणीचे डबे वाढविणे आणि दिवाचे डबे वाढवून ती दादपर्यंत नेणे तसेच जनशताब्दी वेटिंग लिस्टप्रमाणे डब्याची क्षमता वाढविण्याचा पर्याय निर्माण झाल्यास कोकणातील प्रवाशांची गैरसोय दूर होईल.
सिंधुदुर्गचे सुपुत्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री आहेत. त्यांनी खासदार म्हणूनही चार वेळा या भागाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नक्कीच प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेताना रेल्वेत कोकण दिसेल अशी सोय निर्माण करतील, अशी अपेक्षा आहे.