अलिबाग- रायगड जिल्ह्यात पाताळगंगा नदी पात्रात सिलेंडरच्या हजारो टाक्या वाहून आल्याने बुधवारी खळबळ उडाली. चावणे येथील पाताळगंगा एमआयडीसी मधील एचपीसीएलच्या बॉटलींग प्लांट मधून हे गॅस सिलेंडर वाहून आल्याचे वृत्त आहे.  जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीचा फटका औद्योगिक वसाहतींनाही बसला. चावणे येथील पाताळगंगा एमआयडीसी वसाहतीमधील एचपीस एचपीसीएल कंपनीलाही या अतिवृष्टीचा फटका बसला. बुधवारी कंपनीच्या आवारात ३ हजार सिलेंडर ठेवले होते. ज्यात काही भरलेल्या आणि काही रिकाम्या सिलेंडरचा समावेश होता.

पूराचे पाणी कंपनीच्या आवारात शिरल्याने, हे सर्व सिलेंडर पाताळगंगा नदी पात्रात पाण्याच्या लोटा सोबत वाहून गेले. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पेण जवळ खारपाडा येथे नदी पात्रात शेकडो सिलेंडर वाहून येत असल्याचे दिसू लागल्यानंतर खळबळ उडाली. स्थानिकांची हे सिलेंडर अडवण्यासाठी झुंबड उडाली होती.

दरम्यान हे सिलेंडर एचपीसीएल कंपनीचे असून, नागरिकांना हे सिलेंडर आढळून आल्यास तातडीने एचपीसीएलच्या गॅस वितरकाकडे अथवा तहसिलदार कार्यालय, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.