कराड : भाजप हा देशातीलच नव्हे; तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपच्या माध्यमातूनच पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सुटण्यासह जनविकासाचा विश्वास वाटल्यानेच कोणत्याही अटीविना आम्ही भाजपत जाहीर प्रवेश केल्याचे पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले.

मुंबईतील भाजप प्रवेशानंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील, अभिजित पाटील राजाभाऊ शेलार, बाळासाहेब राजेमहाडिक यांच्यासह पाटणकर गटाचे व हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसशी फारकत घेवून भाजप आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्यजितसिंहांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शरद पवार यांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्याचे या वेळी स्पष्ट केले.

आमच्या पक्ष प्रवेशाला भाजपचे मोठे नेते नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होणारी टीका पूर्णपणे चुकीची आहे. पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता, भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि खुद्द छत्रपती आमच्या बरोबर पक्षप्रवेशावेळी होते, यापेक्षा आम्हाला आणखी काय पाहिजे. पक्ष बदलत असताना, आम्ही वेगळ्या वाटेने किंवा सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो नसल्याचा टोला त्यांनी राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना निक्षून लगावला.

पाटण विधानसभा मतदारसंघात ‘महायुती’चेच लोकप्रतिनिधी आणि ते मंत्रीही असल्याने आता आपण तालुक्यात एकत्रित काम करणार का? या प्रश्नावर बोलताना पाटणकर म्हणाले, आपण आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप पक्षप्रवेश केल्यामुळे पक्षाचे विचार तळागळात पोहचवण्यास आमचे पहिले प्राधान्य. भाजप जो आदेश देईल, त्याप्रमाणे आम्ही काम करणार असल्याचे सत्यजितसिंहानी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकल्प होताना माणूसही जगावा

नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत बोलताना पाटणकर म्हणाले, या प्रकल्पात २५० गावे घेतली आहेत. या गावांत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने (एमएसआरडीसी) टाकलेले आरक्षण कोणते आहे हेही स्थानिकांना माहिती नसल्याने भाजपच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आणून तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच व्याघ्र प्रकल्प झाला पाहिजे. परंतु, त्यासोबत तेथील स्थानिक माणूसही जगला पाहिजे, शेतीही वाचली पाहिजे, ही आपली भूमिका आहे. यासाठी भाजपच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले.