करोनाच्या उपचाराची खोटी जाहिरात करता येणार नाही. पतंजलीच्या औषधीला केंद्र अथवा राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची अधिकृत मान्यता दिलेली नाही. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या उपचारासाठी अनधिकृत औषधांची विक्री करता येणार नाही, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित देशमुख उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  पुढे बोलताना देशमुख म्हणाले, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या औषधाबाबत जयपूर एम्स सर्व तपासणी करत असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. तोवर या औषधांच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी मिळणार नाही, अशी पुरेशी सूचनाही त्यांनी दिली असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य शासनाची अधिकृत मान्यता नसताना आशा प्रकारे कोणी जाहिरातबाजी अथवा मार्केटिंग करीत असेल, तर हे अयोग्य आहे. देशात आयसीआरएम आणि राज्यात डीएमईआर सारख्या महत्वाच्या मान्यताप्राप्त संस्था आहेत. अद्याप यापैकी एकाही वैद्यकीय क्षेत्रातील मानांकन बहाल करणाऱ्या संस्थानी पतंजलीकडून करण्यात आलेल्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे राज्यातील सजग नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. खोट्या जाहिराती अथवा दाव्यांना बळी पडू नये, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.