अहिल्यानगर: राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच हजार रुपयांची आग्रीम मदत जाहीर केल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पाथर्डी तालुक्यात रस्तारोको आंदोलन करण्यात आले तर शेवगावमधील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना ५१ रुपयांची मनीऑर्डर पाठवून त्यातून कुटुंबीयांची दिवाळी साजरी करण्याचे आव्हान दिले आहे.

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील शेतकरी मधुकर पाटेकर यांनी ३ हेक्टर ७० गुंठ्यामध्ये कपाशीची लागवड केली. त्यासाठी सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च केला. मात्र पावसाअभावी बहुतांश पीक जळून गेले. गेल्या वर्षी त्यांनी कापसाचा पिक ७३०० विमा भरला होता, यंदा ६२०० रुपये पिक विम्याची भरले. मात्र त्यांना गेल्यावर्षीचा पिक विमा अद्याप मिळालेला नाही. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायचा, असा प्रश्न असतानाच राज्य सरकारने केवळ पाच हजार रुपयांची मदत देऊन दिवाळी साजरी करण्यास सांगितले. ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, असे सांगत मधुकर पाटेकर यांनी आज, गुरू बालमटाकळी येथील टपाल कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांना ५१ रुपयांची मनी ऑर्डर केली व या रकमेमध्ये दिवाळी साजरी करून दाखवा असे आव्हान दिले आहे.

पाथर्डी तालुक्यातील तुळजवाडी फाटा येथील कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्तारोको आंदोलन केले. शेतकऱ्यांना १ लाख रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळावी, रोजगार उपलब्ध करावा, पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारापाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावून आंदोलन केले. राज्य शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत तुटपुंज असल्याचा आरोप करत राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला.

शेवगावमधील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना ५१ रुपयांची मनीऑर्डर पाठवली (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास वाघ व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी केले. बाळासाहेब गर्जे, दत्तात्रय फुंदे, बाबासाहेब वाघ, सोमनाथ कराड, पाराजी शिरसाठ, सुनील पाखरे, सचिन गर्जे, अजित गर्जे, लक्ष्मण गीते, अशोक गर्जे, बाबू घुले, सचिन ढाकणे, शिवाजी नरसाळे, संदीप कराड आदी सहभागी झाले होते.

आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे विकास वाघ म्हणाले शेतकरी गंभीर दुष्काळी परिस्थितीत असताना शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणे अपेक्षित होते. मात्र सरकार केवळ पंचनामे करण्यात मग्न आहे. जनावरांना चारा व पाणी कुठून उपलब्ध करायचे हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने चारा, पाणी व रोजगार उपलब्ध करावा. यावेळी बोलताना शिवशंकर राजळे म्हणाले, शासनाने दिवाळीपूर्वी जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ती शेतकऱ्यांची चेष्टा करणारी आहे. शेतकऱ्यांची झालेली नुकसान लक्षात घेता एक लाखापर्यंत मदत मिळाली पाहिजे. परंतु राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. यावेळी नायब तहसीलदार दिग्विजय पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करत चारा व पाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.