अलिबाग : बौद्धिकदृष्टय़ा अक्षम मुलांसाठी अलिबागमध्ये सुसज्ज शाळा उभारण्याचा ‘पाठबळ सामाजिक विकास संस्थे’चा संकल्प आहे. तो तडीस नेण्यासाठी समाजातील दानशूरांची साथ हवी आहे. विशेष मुलांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचे कार्य ‘पाठबळ सामाजिक विकास संस्था’ राजमाता जिजाऊ विद्यामंदिराच्या माध्यमातून करीत आहे. गेल्या १३ वर्षांपासून विशेष मुलांवर उपचार, त्यांना प्रशिक्षण आणि त्यांचे पुनर्वसन या तीन पातळय़ांवर संस्थेचे हे कार्य सुरू आहे.
हेही वाचा >>> चिंतनधारा : नामस्मरण कुणाचे व कशासाठी?




रायगड जिल्ह्यातील विशेष मुलांचे पालक एकत्र आले आणि त्यांनी ही शाळा सुरू केली होती. या शाळेत सध्या ३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जगण्याला नवी दिशा देण्याचे कार्य ही शाळा करीत आहे. संस्थेच्या कामाचा विस्तार होत असल्याने आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने सध्याची जागा अपुरी पडत आहे. या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी मोठय़ा जागेची आवश्यकता आहे. तसेच ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांचीही गरज आहे. या मुलांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी सुसज्ज कार्यशाळा उभारण्याचाही संस्थेचा मानस आहे. पण आर्थिक पाठबळाअभावी ते शक्य होत नाही, अशी व्यथा संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र ढवळे यांनी व्यक्त केली. सध्या विशेष मुलांचे पालकच पदरमोड करून शाळेचा आर्थिक भार उचलतात. संस्थेला शाळेसाठी स्वत:च्या इमारतीची आवश्यकता आहे. पण हा खर्च संस्था चालवणाऱ्या पालकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यासाठीच संस्थेने समाजातील दातृत्वाला साद घातली आहे.