Khan Sir Patna Court Case : पाटणा जिल्हा न्यायालयाने प्रसिद्ध शिक्षक आणि युट्युबर ‘खान सर’ यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. फैसल खान यांना दिलासा देत पाटणा न्यायालयाने मंगळवारी पुढील आदेश किंवा सुनावणीपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये असा निर्णय दिला आहे.
पाटण्याच्या मुसल्लहपूर भागातील ‘खान ग्लोबल स्टडीज’ (KGS) कोचिंग सेंटरबाहेर झालेल्या हिंचारानंतर, आपल्या सुरक्षारक्षकांना गर्दीवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप फैसल खान उर्फ ‘खान सर’ यांच्यावर आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालय सुनावणी करत होते. २ जूनच्या रात्री कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर झालेल्या हिंचारादरम्यान खान सरांनी गर्दीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते आणि “जे काही होईल ते मी पाहून घेईन” असे सांगितले होते, असा दावा सुरक्षारक्षकांनी तपासकर्त्यांसमोर केला.
यानंतर ४ जून रोजी खान, त्यांचे दोन सुरक्षारक्षक आणि इतरांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्टच्या कलमांखाली भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला. याच घटनेशी संबंधित दुसऱ्या एका एफआयआरमध्ये अटक करण्यात आलेले खान सरांचे प्रतिस्पर्धी आणि ‘ज्ञान बिंदू कोचिंग इन्स्टिट्यूट’चे संचालक रोशन आनंद यांच्या जामीन अर्जावरील आपला निर्णय न्यायालयाने यापूर्वीच सुरक्षित ठेवला होता.
प्रतिस्पर्धी कोचिंग सेंटरच्या समर्थकांकडून खान सरांच्या अटकेची मागणी
याच दरम्यान, ‘ज्ञान बिंदू कोचिंग’चे संचालक रोशन आनंद यांच्या समर्थकांनी सरकार खान सरांना वाचवत असल्याचा आरोप केला आहे. खान सरांना लवकर अटक न झाल्यास सुमारे १०,००० विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान, या प्रकरणातील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रोशन आनंद यांच्या जामीन अर्जावरील आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे.दुसऱ्या एका संबंधित प्रकरणात, खान सरांच्या अंगरक्षकाच्या जामीन सुनावणीदरम्यान रोशन आनंद यांच्या वकिलांनी जामिनाला विरोध केला. हा गोळीबार केवळ गर्दी पांगवण्यासाठी नव्हता तर तो हेतुपुरस्सर करण्यात आला होता, असा आरोप वकिलांनी केला आहे.
