सावंतवाडी: गोवा राज्याच्या सीमेवरील पत्रादेवी चेकपोस्टवर ‘गोवा’ (Government Automated Vehicle Documentation Check) या अत्याधुनिक वाहन तपासणी प्रणालीची सध्या प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू झाली आहे. या प्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप बाकी असली तरी, वाहनधारक आणि पर्यटकांमध्ये याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
या नवीन प्रणालीअंतर्गत चेकपोस्टवर उच्च-तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे वाहनांची नंबर प्लेट (ANPR – Automatic Number Plate Recognition) स्कॅन केली जाते. त्यानंतर काही सेकंदांतच वाहनाची संपूर्ण माहिती प्रणालीमध्ये उपलब्ध होते. यामध्ये वाहनाचा नोंदणी तपशील, विमा (Insurance) वैधता, प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) आणि फिटनेस सर्टिफिकेट (Fitness Certificate) यांची पडताळणी केली जाते. यामुळे वाहनधारकांना कागदपत्रे प्रत्यक्ष दाखवण्याची गरज उरणार नसून तपासणी अधिक जलद व अचूक होणार आहे.
सध्या ही प्रणाली चाचणीच्या टप्प्यात असून, कॅमेऱ्यांची अचूकता, डेटाबेसशी जोडणी आणि चेकपोस्टवरील वाहतूक कोंडी यावर लक्ष दिले जात आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. तसेच, काही गंभीर त्रुटी आढळल्यास वाहनधारकांना गोव्यात प्रवेश नाकारण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
भविष्यातील कडक अंमलबजावणी लक्षात घेता, वाहनधारकांनी आपल्या वाहनांची सर्व कागदपत्रे वेळेत अद्ययावत ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.दरम्यान, महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत ही प्रणाली सुरू झाली आहे.या ठिकाणी वाहने आल्यावर स्कॅन करून प्रदूषण प्रमाणपत्रे नसल्याने काही वाहन धारकांना नोटिसा बजावल्या असल्याचे समोर आले आहे.
