Pawar Family Wedding : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीचं रेवती सुळेचं लग्न नुकतंच पार पडलं. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अत्यंत थाटामाटात हे लग्न झालं. त्यांतर आता पुन्हा एकदा पवार कुटुंबियांच्या घरात सनई चौघड वाजणार आहेत. नुकतेच राज्यसभेवर गेलेले खासदार पार्थ पवार लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा माध्यमावर सुरू आहे. गेल्या वर्षभरात पवार कुटुंबियांच्या घरात चार लग्न सोहळे झाले. या चारही लग्न सोहळ्यातील दिमाखदार कार्यक्रम अवघ्या राज्याने अनुभवले. तर, “येत्या काही दिवसांत अजून दोन-तीन वेटिंगमध्ये असून लवकरच त्याबाबत गोड बातमी कळेल”, अशी प्रतिक्रिया काल (१२ जुलै) खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पार्थ पवारांच्या लग्नाची लगबग सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार यांचे ज्येष्ठ सुपूत्र पार्थ पवार लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. मूळची काश्मीरची असलेल्या आणि सध्या दिल्लीत वास्तव्यात असलेल्या कायनात धार या तरुणीबरोबर त्यांचा विवाह होणार आहे. कायनात धार या रेवती सुळेच्या लग्नातही आल्या होत्या. पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या एकत्रित एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता पुन्हा एकदा या जोडीने लक्ष वेधून घेतलं असून या दोघांचा साखरपुडा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित असल्याचं म्हटलं जातंय. आमदार रोहित पवार यांनी काल याविषयी पोस्ट करून माहिती दिली. २९ जुलै रोजी या दोघांचा साखरपुडा होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

रेवती सुळेचं लग्न अत्यंत थाटामाटात पार पडलं

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचंही २० जून रोजी लग्न झालं. नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि राज्यसभेचे खासदार अरुण लखानी यांचे सुपूत्र सारंग लखानी यांच्याबरोबर रेवती विवाहबद्ध झाली. या लग्नसोहळ्यात जवळपास पाच हजारांहून अधिक मान्यवर मंडळी उपस्थित होते. अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला असून नुकतंच रेवतीने पुण्यात रिसेप्शनही ठेवलं होतं.

जय पवार यांनी बहारीनमध्ये केलं होतं लग्न

दरम्यान, गेल्यावर्षी डिसेंबर २०२५ मध्ये अजित पवार यांचे धाकटे सुपूत्र जय पवार यांचाही विवाह झाला. बहारीन येथे अत्यंत थाटामाटात ५ डिसेंबर २०२५ रोजी ऋतुजा पाटील यांच्याबरोबर जय पवार विवाहबद्ध झाले. जय पवार आणि ऋतुजा पवार यांच्या या डेस्टिनेशन वेडिंगला ४०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांचे या दाम्पत्याला शुभाशीर्वाद लाभले.

युगेंद्र पवारही अडकले विवाहबंधनात

तर, जय पवार यांच्या विवाहाच्या काही दिवसांआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार हे विवाह बंधनात अडकले होते. तनिष्का कुलकर्णी यांच्याबरोबर ते ३० नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध झाले. बीकेसीतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे त्यांचा लग्नाचा सोहळा पार पडला होता.

युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या विवाह सोहळ्यातील फोटो

नोव्हेंबर २०२५ पासून पवार कुटुंबात लगीनघाई सुरू आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाआधी युगेंद्र पवार आणि जय पवार यांचा विवाह झाला. यादरम्यान, रेवती सुळेच्या लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र, दरम्यानच्या काळात २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर रेवतीच्या लग्नाबाबत सुप्रिया सुळे यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर घोषणा केली होती. विविध नेते मंडळी अन् मान्यवरांच्या घरी जाऊन सुप्रिया सुळे यांनी लेकीच्या लग्नाचं वैयक्तिक आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे रेवती सुळेच्या लग्नात विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हजर होते. आता पुन्हा एकदा पार्थ पवारांच्या निमित्ताने पवार कुटुंबियांच्या घरात सनई चौघडे वाजणार आहेत.