सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांची निवडणूक एकतर्फी करण्याचे शरद पवार यांनी ठरविल्याचे स्पष्ट होत आहे.
    उदयनराजे भोसलेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवार वाईला प्रचार सभेसाठी आले होते. या सभेच्या वेळी त्यांनी उदयनराजेंना विचारले की, तुमची लढत नक्की कोणाशी आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजेंच्या विरोधात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीने ही जागा शिवसेनेकडून काढून आरपीआयला दिली आहे. त्यामुळे  सेना भाजपात अस्वस्थता आहे. यावेळी उदयनराजे भोसलेंना ही निवडणूक जड जाणार अशी अटकळ बांधली जात असताना या जागेसाठी शरद पवारांनी जिल्हय़ातील ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील यांना हाताशी धरून त्यांच्या मार्फत उदयनराजेंना विरोध दर्शवून व स्वत वेगवेगळी विधाने करून उमेदवारीबाबत सस्पेंस राखत उदयनराजे भोसलेंनाच पुन्हा संधी दिली. तोपर्यंत महायुतीने सातारची जागा आरपीआयला देऊन टाकली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषात्तम जाधव यांनी सर्व पदाचा राजीनामा देत बंडखोरी केली. मागील निवडणुकीत जाधव यांना उदयनराजेंशी लढताना अडीच लाख मते मिळाली होती. यावेळी त्यांना निवडून येण्याची खात्री आहे. आरपीआयने जिल्हाप्रमुख अशोक गायकवाड यांना संधी दिली आहे. त्यांना सेना भाजपासह अनेकांच्या पाठिंब्याची आशा आहे. तर ‘आप’चे राजेद्र चोरगे आणि संदीप मोझर, वर्षां  माडगूळकर आदींसह १७ उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या विरोधात आहेत.
    सातारा जिल्हयाचं आजच राजकारण अनेक सत्ताकेंद्र सहकारी संस्था, जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, नगरपालिकांसह अनेक गावपातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. सातारा शिवेद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तर बाळासाहेब पाटील, पाटण विक्रमसिंह पाटणकर, कोरेगावला पालकमंत्री शशिकांत शिदे, वाईला मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार प्रचाराच्या कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण कऱ्हाड दक्षिणचे आमदार विलासराव उंडाळकर आणि काँगेस पक्ष प्रचारात उतरत आहे. त्यात जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, युवक काँग्रेसचे नेते विकास िशदे आदी सहभागी होत आहेत  
    या राजकारणाचा विचार करत सर्व आमदारांना त्यांनी कामाला जुपंले आहे. वेळप्रसंगी काँग्रेसलाही बरोबर घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. उदयनराजेंनीही कोणती कसर न ठेवता सर्वाना भेटून सहकार्याची विनंती करत आपल्याविषयीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते फक्त सातारा शहरातच आपली प्रचार यंत्रणा राबवत आहेत. मतदानाला दहा बारा दिवस उरलेले असताना अनेक उमेदवार मतदारसंघात पोहोचलेही नाहीत. या बाबींचा अंदाज घेऊन शरद पवारांनी वाईच्या सभेच्या निमित्ताने उदयनराजेंच्या विरोधात खंबीर उमेदवार नसल्याने प्रचाराच्या शेवटच्या टप्यात निवडणूक एकतर्फी होईल अशी व्यूहरचना करण्याचे आदेश सर्वांना दिले आहेत.