MBA झालेल्या पायल झांबरे या विवाहित तरूणीचा मृत्यू पुण्यातल्या मुकुंद नगर भागात झाला. तिने सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवल्याचा संशय आहे. कारण पायलच्या माहेरच्यांनी तसा आऱोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. तर तिच्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, हुंड्यासाठी छळ, घरगुती हिंसाचार ही कलमं त्यांच्यावर लावण्यात आली आहेत. दरम्यान पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे तसंच पायलच्या शेवटच्या मेसेजबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पायलने भावाला शेवटचा मेसेज पाठवला होता, त्यात सासूचं नाव होतं
११२ क्रमांकावर आम्हाला फोन आला. मुकुंद नगर झांबरे पॅलेस या ठिकाणी ही घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळी पायल झांबरेचा मृतदेह आढळून आला. पायलने मृत्यूपूर्वी तिच्या भावाला एक मेसेज केला होता, ज्यात याला सासू जबाबदार असेल असं लिहिलं होतं. त्यामुळे ही आत्महत्या असावी हे प्राथमिकरित्या सिद्ध झालं. आम्ही तातडीने पायलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पायलच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वारगेट पोलीस ठाण्याचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ही माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली.
पायलचा विवाह २०१९ मध्ये झाला होता
पायल झांबरेचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. मुकुंद नगर मध्ये ती लग्नानंतर राहात होती. त्यांच्या कुटुंबात कलह होता हे दिसून येतं आहे. पण कुठलंही प्रकरण हे पोलिसांपर्यंत पोहचलेलं नाही. त्यासंदर्भातली कुठली तक्रार पोलीस ठाण्यात नाही. कौटुंबिक पातळीवर वाद झाले होते. दोन्ही कुटुंबांच्या बैठकाही झाल्या होत्या. ज्यानंतर पायलने टोकाचं पाऊल उचललं. आम्ही या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
FIR मध्ये जे आरोप करण्यात आले आहेत त्याचा तपास करतो आहोत-मोहिते
FIR मध्ये मुलगा हवा आहे,सोनं हवं आहे म्हणून दबाव टाकण्यात येत होता असं म्हटलं गेलं आहे. नातेवाईकांच्या सांगण्यानुसार मारहाणही होत होती. आता या प्रकरणी तपास सुरू आहे. त्या अनुषंगाने पुढे माहिती समोर येईल. झांबरे हे मुकुंद नगरमधलं नामांकित प्रस्थ आहेत. पायलच्या माहेरचं कुटुंब हे देखील सधन आहे. घटना घडल्यानंतर झांबरे पॅलेस या ठिकाणी पायलच्या कुटुंबाकडून दगडफेक करण्यात आली. त्यासंदर्भात तक्रार झालेली नाही असं मोहिते यांनी सांगितलं.
