Payal Pawar Zhambre Death Case : पायल पवार-झांबरेच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे या विवाहितेनेही सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं होतं. आता अगदी त्या प्रकरणाची पुनरावृत्ती पायल पवारच्या मृत्यूनंतरही झाली आहे. पायलने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मात्र पायलच्या माहेरच्या मंडळींनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पैशांसाठी आणि सोन्यासाठी पायलचा छळ सुरू होता. तसंच मुलगाच हवा हा झांबरे कुटुंबाचा हट्ट होता. यामुळेच आमच्या मुलीला त्यांनी मारलं असं पायलच्या कुटुंबाने म्हटलं आहे. पोलिसांनी पायलचा नवरा अक्षय झांबरेला अटक केली आहे. मात्र पायलचे सासरे, सासू आणि नणंद फरार आहेत. पायलच्या माहेरच्यांनी झांबरे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला काय घडलं?

३१ तारखेला पायल आणि तिच्या नवऱ्याचं तसंच सासरच्या लोकांचा वाद झाला होता. शनिवारी उशिरा आम्ही त्यांना फोनही केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. रविवारी म्हणजेच १ नोव्हेंबरच्या सकाळी तिच्या सासऱ्यांनी आम्हाला फोन केला. आम्ही सकाळी ७.३० लाच तिच्या घरी गेलो. ती कुठे आहे आम्हाला माहीत नाही वगैरे टाळाटाळ त्यांनी सुरू केली. मग आम्ही तिचा शोध सुरू केला. दुसऱ्या घरी गेलो तेव्हा स्वयंपाक घरात पायलचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. अशी माहिती पायलच्या भावाने दिली आहे.

पायलचे वडील काय म्हणाले?

पायलचे वडील म्हणाले, पायलच्या सासरच्या लोकांनी आमच्याकडे पाच तोळे सोन्याची मागणी केली होती. आम्ही त्यांना विनंती केली होती थोडा विचार करा आमचा कारण दुष्काळ पडला आहे. मात्र शनिवारच्या रात्रीच घातपात केला. माझी मुलगी चुकीची नव्हती, तिला दोन्ही घरांचा विचार करावा लागत होता. प्रॉपर्टीही नवऱ्याच्या नावावर कर ही मागणी केल्यानंतर ती आतून तुटली. त्यातूनच ही घटना घडली. तुझे आई बाप भिकारी आहेत असं तिचे सासू-सासरे तिला कायम म्हणायचे. सतत माहरेचा विषय काढायचा आणि तिला टोमणे मारायचे असंही पायलच्या वडिलांनी सांगितलं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत आपली खंत आपला संताप पवार कुटुंबाने व्यक्त केला आहे.

प्रतिष्ठेसाठी आमच्या मुलीला खाल्लं, गिळलं, पायलच्या वडिलांना अश्रू अनावर

प्रतिष्ठेसाठी म्हटलं की खोटं आलंच. त्यांनी त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांनी आमची मुलगी खाल्ली, गिळली. पायलच्या सासूला श्रीमंतीचा खूप गर्व होता. तिने कधीही पायलला चांगली वागणूक दिली नाही असंही तिचे वडील म्हणाले. तर भावाने सांगितलं की पायलला तिची सासू म्हणायची एखादी दोरी शोध किंवा तुझ्या ओढणीने गळफास घे. तुझ्या मुलीलाही ढकलून दे कुठेतरी आणि संपव. असे गंभीर आरोप पायलच्या कुटुंबाने केले आहेत. सासू, सासरे आणि नणंद फरार आहेत. त्यांना ज्यांनी आसरा दिला आहे त्यांनाही सहआरोपी करावं अशी आमची मागणी आहे असंही पायलच्या कुटुंबाने म्हटलं आहे.