पिंपरी चिंचवडमधला लसींचा तुटवडा लक्षात घेता, लसींच्या किमान १५ लाख मात्रांसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचं नियोजन करत असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

लसींच्या तुटवड्यामुळे पिंपरी चिंचवड भागातलं लसीकरण आज बंद ठेवण्यात आलं आहे. लसीकरण केंद्र बंद असल्याने लोकांनी लसीकरणासाठी गर्दी करु नये असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. दुपारपर्यंत राज्याच्या आरोग्यविभागाकडून महापालिकेला लसींचा पुरवठा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारचं लसीकऱणाचं नियोजन लसींचा साठा झाल्यावरच जाहीर करणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

या ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून थेट लस विकत घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री स्वतः म्हणाले की महापालिका प्रशासनाला जर थेट लसी विकत घ्यायच्या असतील तर त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक नाही.

महापौर उषा ढोरे असंही म्हणाल्या की, एकदा का लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाला की संपूर्ण शहराचं लसीकरण करता येईल. सध्या लसींच्या कमतरतेमुळे काही ठिकाणचं लसीकऱण थांबवावं लागत आहे. नागरिक दररोज लसीकऱण केंद्राबाहेर गर्दी करत आहेत आणि मोठ्या रांगा लावत आहेत. यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आम्ही लसींची खरेदी कऱण्याचं नियोजन करत आहोत आणि लसींचा पुरेसा साठाही करणार आहोत. ज्यामुळे गर्दी टाळून लसीकऱण पूर्ण करता येईल.

मुंबई आणि पुण्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही थेट लस खरेदी कऱणारी तिसरी महानगरपालिका ठरणार आहे, असंही त्या म्हणाल्या.