अलिबाग– पेण नगरपालिकेने नव्याने बसविलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. मॉडर्न आर्टच्या नावाखाली छत्रपती संभाजी महाराजांचा आपत्तीजनक असल्याचा आरोप शिवप्रेमी संघटनांनी केला आहे. हा पूतळा तातडीने हटवून नवीन छत्रपती संभाजी महाराजांचा नवीन पुतळा बसविण्याची मागणी केली आहे.

पेण नगरपालिकेने २२ लाख रुपये खर्चून नव्याने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले होते. मात्र अनावरण होताच या पुतळ्यावरून शिवप्रेमींनी संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली. मॉडर्न आर्टच्या नावाखाली संभाजी महाराजांचा आपत्तीजनक पुतळा बसविल्याचा आक्षेप घेण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शौर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेचे प्रतिक मानले जातात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महराजांच्या नावाने राज्यकारभार करणाऱ्या सत्ताधारी भाजप नेत्यांनी संभाजी महाराजांचे अत्यंत आपत्तीजनक शिल्प उभारले होते. आपण जेव्हा स्मारके पुतळे उभे करतो, तेव्हा त्यांनी केलेल्या कार्याची गाथा आणि प्रेरणा मिळावी हा उद्देश होता. पण योग्य काळजी न घेता सल्ला मसलत न करता हे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यामुळे ते तातडीने हटविण्याची मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते प्रसाद भोईर यांनी केली.

पेण चिंचपाडा चौकात छत्रपती संभाजी महाराज चौक उभारणीसाठी मागणी केली जात होती. मात्र हे करतांना छत्रपतीं संभाजी महाराज यांचा जो पुतळा उभारला गेला, त्यामुळे तमाम पेणकर नाराज आहेत. हा पुतळा तातडीने बदलावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल वैभवी म्हात्रे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे फक्त दुसरे छत्रपती नाहीत तर या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या आणि निष्ठा असणाऱ्या प्रत्येकासाठी मानबिंदू आहेत. आमच्या संस्कारासाठी आणि संस्कृतीसाठी सर्वोच्च बलिदान दिलेले व्यक्तीमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. मॉडर्न आर्टच्या नावाखाली जो पुतळा पेण मध्ये उभा करण्यात आला आहे. तो तातडीने हटविण्यात यावे, आणि तिथे महाराजांच्या किर्तीला साजेसा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघोजीराजे आंग्रे यांनी केली आहे.

या पुतळ्याबाबत वाढत्या नाराजीची दखल घेऊन नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी हा पुतळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिका प्रशासनाने रात्रोरात पुतळा झाकून टाकला आहे. तर लवकरच छत्रपती संभाजी महाराजांचा नविन पुतळा बसविण्याची ग्वाही दिली आहे. झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.