अलिबाग– समाज माध्यमांवर सुरू झालेली टीका, रस्त्यावर उतरून छावा संघटनांनी केलेले आंदोलन आणि लेखी तक्रारी यांची दखल घेऊन पेण नगर परिषदेनी एक पाऊल मागे घेतले. नगराध्यक्षांनी जनभावना दुखावल्या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर, नव्याने बसविण्यात आलेला पुतळाही आता हटविला आहे.
पेण शहरातील चिंचपाडा परिसरात संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. छावा संघटना यासाठी पाठपुरवा करत होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन नगर परिषदेनी चिंचपाडा येथे छत्रपती संभाजी महाराजाचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता. आमदार निधीतून २२ लाख रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.
स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत मॉडर्न आर्ट स्वरूपातील पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र अनावरणानंतर काही तासातच या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला. हा पुतळा आपत्तीजनक असल्याची तक्रार केली जाऊ लागली. मॉडर्न आर्ट स्वरूपातील या पुतळ्यावर सामाजिक संघटना आणि ऐतिहास प्रेंमीनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. पुतळ्या संभाजी महाराजांसारखा दिसतच नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. समाज माध्यमांवर या पुतळ्याचे तीव्र पडसा उमटण्यास सुरुवात झाले.
त्यामुळे नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. प्रशासनाच्या चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी स्पष्ट केले. पुतळा तातडीने बदलण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले. या नंतर नगर पालिका प्रशासानाने सुरवातीला लाल कापड टाकून पुतळा झाकून टाकला. त्यानंतर जनतेचा रोष वाढण्याची शक्यता असल्याने, नगर परिषदेचे कर्मचारी रात्रीच चिंचपाडा येथे दाखल झाले. त्यांनी मध्यरात्री दोन वाजता पुतळा हटविला. आता याच ठिकाणी नवीन छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविला जाणार आहे.
महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी शासनाने कठोर नियमावली केली आहे. त्याचे पालन करणे त्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे, पुतळा समितीची परवानगी घेणे गरजेचे असते, पुतळ्याची सुरक्षा देखभाल याचे व्यवस्थापन आवश्यक असते, पुतळ्यामुळे जनभावना दुखावल्या जाणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे असते. मात्र हा पुतळा उभारतांना ही खबरदारी घेतली होती का आणि शासनाचे निकष पाळले गेले होते का याची चौकशी करणे आवश्यक आहे. नव्याने तयार करण्यात येणारा पुतळा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाची साक्ष देणारा आणि प्रेरणादायी असवा अशी मागणी पेणकरांनी केली आहे.
