अलिबाग – पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाला आता महिलांच्या कष्टाची आणि कलाकुसरीची भक्कम साथ मिळत आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये दिवस-रात्र काम सुरू असून, पुरुष कारागिरांसोबत महिलाही खांद्याला खांदा लावून बाप्पाला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. मूर्ती घडवण्यापासून रंगकाम, डोळ्यांची आखणी, कलाकुसर, वस्त्रालंकार, पगडी आणि फेटे तयार करण्यापर्यंतची विविध कामे महिला कौशल्याने पार पाडत आहेत.

पेण तालुक्यातील अंतोरे, दादर, जोहे, कळवे, तांबडशेत, हमरापूर, वडखळ, बोरी, शिर्की, उंबर्डे, कोप्रोली तसेच पेण शहरातील कासार आळी, गुरव आळी, फणसडोंगरी, नवीन वसाहत, कुंभार आळी, गांगळ आळी, नंदिमाळ नाका आणि उत्कर्षनगर परिसरातील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सध्या मोठी लगबग पाहायला मिळत आहे. मूर्तींच्या प्राथमिक निर्मितीचे काम पूर्ण झाल्यानंतर आता रंगकाम आणि सजावटीची कामे अंतिम टप्प्यात आली आ

हेत. या कामात महिलांचा मोठा वाटा आहे. मूर्तीला आकर्षक रंगसंगती देणे, चेहऱ्यावरील भाव खुलवणे, डोळ्यांची आखणी करणे, कपडे तयार करणे, वस्त्रालंकार करणे तसेच मुकुट, पगडी आणि फेट्यांची सजावट करण्याची जबाबदारी अनेक महिला कारागीर समर्थपणे सांभाळत आहेत.

विशेष म्हणजे, केवळ सजावटीपुरता महिलांचा सहभाग मर्यादित राहिलेला नाही. अनेक महिला थेट मूर्ती घडविण्याच्या कामातही सहभागी झाल्या आहेत. मातीपासून किंवा शाडूपासून मूर्तीला आकार देणे, हात-पाय आणि चेहऱ्याचे बारकावे तयार करणे, त्यानंतर रंगकाम आणि कलाकुसर करण्यापर्यंतची कामे त्या आत्मविश्वासाने करत आहेत. गणेशमूर्तीचा चेहरा आणि डोळ्यांची आखणी हा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील जिवंतपणा आणि रंगसंगती यामुळे मूर्तीचे सौंदर्य खुलते. त्यामुळे या कामासाठी कौशल्य आणि बारकाईची गरज असते. अनेक महिला कारागीर हे काम अत्यंत काळजीपूर्वक आणि कलात्मक पद्धतीने करत आहेत.

पेणच्या गणेशमूर्तींची ओळख केवळ मूर्तीच्या आकारामुळेच नव्हे, तर त्यांच्या आकर्षक सजावटीमुळेही आहे. बाप्पासाठी तयार करण्यात येणारे विविध प्रकारचे पोशाख, दागदागिने, मुकुट, पगडी आणि फेटे यांना अंतिम रूप देण्याचे काम महिलांकडून केले जात आहे. कापड, लेस, मोती, खडे, कुंदन आणि विविध सजावटीच्या साहित्याचा वापर करून महिला कारागीर बाप्पाच्या रूपात अधिकाधिक आकर्षकता आणत आहेत.

महिलांना रोजगाराची संधी

गणेशमूर्ती व्यवसायामुळे गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होते. विशेषतः मूर्तींच्या रंगकाम आणि सजावटीच्या कामांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर काम मिळते. जवळपास वर्षभर विविध प्रकारचे काम चालते. घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत अनेक महिला या व्यवसायाशी जोडल्या गेल्या असून, त्यांच्या हातातील कलाकुसरीमुळे पेणच्या गणेशमूर्तींचे सौंदर्य आणखी खुलत आहे. पेणच्या गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून मोठी मागणी असते. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह अनेक शहरांमध्ये येथून मूर्ती पाठवल्या जातात. त्यामुळे गणेशोत्सव जवळ येताच मूर्ती वेळेत पूर्ण करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची लगबग वाढली आहे.

बाप्पाच्या आगमनापूर्वी प्रत्येक मूर्ती अधिक देखणी आणि आकर्षक करण्यासाठी महिला आणि पुरुष कारागीर रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तींच्या निर्मितीमध्ये महिलांचे योगदान आता केवळ सहाय्यक भूमिकेपुरते मर्यादित न राहता मूर्तीनिर्मितीपासून अंतिम सजावटीपर्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

पेण तालुक्‍यातील ज्‍या कार्यशाळा आहेत ते महिलांना वर्षभर काम असते. खास करून कलाकुसर आणि मुर्ती वस्‍त्रालंकारांनी सजवण्‍याच्‍या कामात महिला तरबेज झाल्‍या आहेत. घरची कामे सांभाळून महिला हे काम करीत असतात त्‍यातून त्‍यांना चांगला रोजगार उपलब्‍ध झाला आहे.- सोनाली पवार, गौरी कला केंद्र पेण