Raigad Pen Ganesh Murti Flood Loss update: गणेशोत्सवाला अवघा महिना उरला असताना गणेश मूर्ती घडविणाऱ्या शेडमध्ये लगबग दिसत आहे. मात्र आठवड्याभरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील मूर्तीकारांचे मोठे नुकसान झाले. गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्र आणि देशभरात सुंदर मूर्तींचा पुरवठा पेण तालुक्यातील जोहे आणि तांबडशेत या गावांमधून होत असतो. पण मंगळवारी अचानक आलेल्या पुरामुळे या गावातील शेकडो मूर्तीकारांना हतबलतेचा सामना करावा लागला.
द इंडियन एक्सप्रेसने या दोन गावातील झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला आहे. यापूर्वी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे गणेश मूर्तींची निर्यात विस्कळीत झाली आहे. या संघर्षामुळे शिपिंग खर्चापासून ते इतर आव्हाने उभी राहिल्यामुळे मूर्तीकारांसमोर आधीच मोठी अडचण असताना मंगळवारी झालेल्या पावसामुळे आणखी बिकट परिस्थिती ओढवली आहे.
तांबडशेत आणि जोहे या दोन गावांतून राज्याच्या कानाकोपऱ्यात गणेश मूर्ती पाठवल्या जातात. मंगळवारी पडलेला मुसळधार पाऊस आणि खाड्यांचे पाणी गावात शिरल्यामुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. मूर्तीकारांच्या कारखान्यात वेगाने पाणी शिरल्यामुळे अनेक महिन्यांची मेहनत क्षणात वाहून गेली. शिवरत्न कलाकेंद्रचे प्रमुख आणि अनेक पिढ्यांपासून गणेशमूर्ती घडवणाऱ्या महेंद्र पाटील यांनी सांगितले की, आम्ही असा प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.

महेंद्र पाटील द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना म्हणाले, “आमच्याकडे दीड ते दोन फुटांच्या जवळपास ५०० मूर्ती तयार होत्या. ज्या लवकरच मुंबई आणि पुणे शहरात विक्रीसाठी पाठविल्या जाणार होत्या. मंगळवारी केवळ अर्ध्या तासात सर्व काही वाहून गेले. मी सकाळी ११.३० वाजता कारखान्यात गेलो, तेव्हा तिथे काहीच पाणी नव्हते. पण थोड्याच वेळात पाणी साचले. यामुळे आमचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.”
श्री गणेश आर्ट्सच्या प्रशांत पाटील यांनी म्हटले की, आमच्या सुमारे ४०० मूर्ती पाण्यामुळे खराब झाल्या. जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मूर्ती तयार करण्यासाठी कर्ज काढले होते, त्याचा विमा आहे. पण नुकसान भरपाई किती आणि कधी मिळेल? याची काही शाश्वती नाही.
हमरापूर गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष अनंत मोकन यांनी म्हटले की, गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या ८० टक्के मूर्ती आमच्या गावातून पाठवल्या जातात. या दोन गावात १,००० हून अधिक मूर्तीकार आहेत. जवळपास ५० कुटुंबाचे कारखाने सखल भागात आहेत. पुराच्या पाण्यामुळे त्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
प्रत्येक मूर्तीकाराचे १० ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले असून आम्ही संपूर्ण नुकसानाचा आढावा घेत आहोत. आमच्या अंदाजाप्रमाणे हे नुकसान कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे, असेही अनंत मोकन यांनी सांगितले.

इको-फ्रेंडली मूर्तीचे सर्वाधिक नुकसान
मोकन पुढे म्हणाले की, पुरामुळे गावातील पाण्याची पातळी पाच ते सहा फूटापर्यंत पोहोचली होती. सर्वाधिक नुकसान पर्यावरणपूरक मूर्तींचे झाले आहे. या मूर्ती पाण्याच्या संपर्कात आल्यास त्याचे तात्काळ विघटन सुरू होते. त्यामुळे या मूर्तींचे सर्वाधिक नुकसान झाले.
एका बाजूला मूर्तींचे नुकसान तर दुसऱ्या बाजूला ज्या ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली आहे, ती आता परत कशी करावी, याचा ताण आता मूर्तीकारांवर आला आहे. अनेक मूर्तीकारांनी बँकांकडून कर्ज काढून मूर्तीसाठी कच्चा माल घेतला होता, त्याचीही चिंता अनेकांना सतावत असल्याचेही मोकन म्हणाले.
