अलिबाग – सोन्याची चैन आणि मोबाईल लुटण्याच्या उद्देशाने ६० वर्षीय पांडुरंग लहू भडकले यांचा दगडाने मारहाण करून खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पेण तालुक्यातील कांदळेपाडा येथील रोजेश नागू म्हात्रे आणि बारशेतवाडी येथील गोवर्धन सिताराम वाघमारे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अतिरिक्त सत्र न्यायालय, न्यायाधीश सुनीता तिवारी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. संतोष पवार यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
मयत पांडुरंग भडकले हे बोरगाव येथील रहिवासी होते. आरोपींनी संगनमत करून त्यांना मोटारसायकलवरून घटनास्थळी नेले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि खिशातील मोबाईल काढून घेतल्यानंतर चेहरा व डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कालव्याच्या पाण्यात टाकून दिला होता.
या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. तपासात पोलिसांनी आरोपींविरोधात ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर केले.
न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ३०२ सह ३४ अन्वये दोन्ही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कलम २०१ सह ३४ अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, तर कलम ३९७ सह ३४ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास संबंधित अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली.
या खटल्यात फिर्यादी, पंच, साक्षीदार, तपासी अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी अभियोक्ता अॅड. संतोष पवार यांच्यासह अॅड. प्रमोद हजारे, अॅड. कोमल राठोड आणि अॅड. दिलीप बहिरम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
तपासादरम्यान पोलीस हवालदार जयवंत बैकर यांनी महत्त्वाचे सहकार्य केले. तसेच पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगधर, सहायक फौजदार पांडुरंग पाटील, पोलीस शिपाई भाऊराव पाटील आणि पोलीस शिपाई विजय बोदरे यांनी खटल्याच्या कामकाजात मोलाची भूमिका बजावली.
