अलिबाग: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एका आदिवासीवाडीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच परिसरातील २४ वर्षीय किरण वाघमारे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर अत्याचाराच्या स्वरूपाबाबत स्पष्टता येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बालिका सोमवारी रात्री घरासमोर झोपली होती. रात्रीच्या वेळी आरोपीने तिला घरापासून सुमारे शंभर मीटर अंतरावरील निर्जन ठिकाणी नेल्याचा संशय आहे. काही वेळाने मुलगी दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने पेण पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. मंगळवारी सकाळी एका निर्जन ठिकाणी बालिका मृतावस्थेत आढळून आली. घटनास्थळावरील प्राथमिक पुरावे, संशयास्पद हालचाली आणि मिळालेल्या माहितीनुसार किरण वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर लैंगिक अत्याचारासह मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पुण्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवथरे, पेण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे अन्वेषण पथकाने भेट देऊन तपासाची पाहणी केली.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत पेण तालुक्यातील लैंगिक अत्याचारानंतर खूनाची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी शितोळेवाडी परिसरात एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. त्या प्रकरणात दोन परप्रांतीय आरोपींना अटक करण्यात आली होती. सलग घडलेल्या या घटनांमुळे पेण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या आणि पालकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.