पत्रकारांना निवृत्तीवेतन लागू करण्यासंदर्भात विविध पर्याय तपासून पाहिले जात असून त्यासाठी एक समिती गठित करण्यात येणार आहे. पत्रकारितेत काम केल्यानंतर आयुष्याच्या उतारवयात पत्रकारांना जगण्याचा आधार मिळवून देण्यासाठी सरकार म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात अमरावती श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार आनंदराव अडसूळ होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, रवी राणा, रमेश बुंदिले, महापौर चरणजीतकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, श्रमिक पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष यदू जोशी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजापेठेत उभारण्यात आलेल्या अमरावती श्रमिक पत्रकार संघाच्या भवनाचे उद्घाटन झाले. दैनिक हिंदूस्थानचे संस्थापक संपादक दिवं. बाळासाहेब मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ‘बिंब प्रतिबिंब’ या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
पत्रकारांना कमी किंमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील. याशिवाय, त्यांच्यावरील हल्ल्यांसंदर्भात कायदा तयार करण्यासाठी विविध स्तरावर विचारविनिमय सुरू असून पत्रकारितेच्या बुरख्याखाली ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या पत्रकारांना मात्र त्यात वाव मिळू नये आणि जीव धोक्यात घालून अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना पूर्ण संरक्षण मिळेल, अशा तरतुदी केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सरकारवर अंकूश ठेवण्यासाठी पत्रकारांनी टीका केली पाहिजे. प्रशासनरूपी हत्ती त्याशिवाय हलत नाही, पण ती वस्तूनिष्ठ असायला हवी, तेव्हाच ती परिणामकारक ठरते. पत्रकारांना लोकशाहीत टीकेचा अधिकार मिळाला आहे. फक्त तो गाजवण्याच्याच वृत्तीचा शिरकाव झाला, तर पत्रकाराचे पतन सुरू होते. पत्रकारितेत ‘न्यूज व्हॅल्यू’पेक्षा ‘व्हॅल्युएबल न्यूज’ काय, याचा विचार करावा. त्यांनी विश्वासार्हता टिकवून ठेवली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्ताविक शिवराय कुळकर्णी, संचालन रवींद्र लाखोडे यांनी, तर संजय पाखोडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात प्रदीप देशपांडे, नानक आहुजा, शशिकांत ओहळे, सुरेश शुक्ल, अनिल जाधव, मनोहर परिमल, कुमार बोबडे, जितेंद्र दोशी, अरुण मंगळे, देवदत्त कुळकर्णी या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

‘शेतीक्षेत्रात आमुलाग्र बदल आवश्यक’
राज्यात पावसाने ओढ दिली, हा मोठा चिंतेचा विषय आहे. केवळ सवंग घोषणा करून शेतीसमोरचे संकट दूर होणार नाही. विदर्भात सिंचनाचा अभाव हा मोठा विषय असून त्यावर उत्तर शोधण्याऐवजी आपण दुसऱ्याच विषयावर लक्ष केंद्रित करतो, हे चुकीचे आहे. शेतीक्षेत्रात आमुलाग्र बदल आवश्यक आहेत, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी सिंचनासाठी सातत्याने लढा देणाऱ्या माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्या योगदानाचाही उल्लेख केला.