इराण आणि इस्रायलमध्ये जे युद्ध सुरु झालं आहे, ज्यानंतर अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, गिरीश महाजन यांना यासंदर्भातली जबाबदारी दिली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
इराण आणि इस्रायल यांचं जे युद्ध सुरु झालं त्यानंतर एअर स्पेस बंद झाली. त्यानंतर भारतीय पर्यटक किंवा व्यवसायासाठी जे लोक गेले त्यांचे मेसेज आपल्याला येऊ लागले. त्यानंतर आपण केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला. त्यांनी दुतावासाशी संपर्क करायला सांगितलं. आपल्या राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली आहे. आपण WA नंबर दिला आहे, तिथल्या लोकांच्या अडचणी आपण दूर करतो आहोत. अडकलेल्या लोकांना परत आणण्याचे प्रयत्नही आपण सुरु केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
गिरीश महाजन तिथल्या लोकांच्या संपर्कात आहेत
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, एअर इंडियाची विमानं आता हळूहळू जात आहेत आणि लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस सुरु आहेत काही बंद आहेत. जिथून आणता येणं शक्य आहे तिथून आणलं जातं आहे. कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता कारण ट्रांझिटचे लोक तिथे आहेत, त्यांच्याकडे व्हिसा नसल्याने अडचणी होत्या. पण आता प्रयत्नपूर्वक त्यांना एका ठिकाणी थांबवलं आहे. मराठी मंडळं, इतर मंडळांना आपण अॅक्टिव्हेट केलं आहे. तिथल्या मराठी लोकांना आपण मदत करत आहोत. गिरीश महाजन यांनी अनेकांना व्हिडीओ कॉलही केले आहेत. आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत त्यांनाही आपण जबाबदारी दिली होती. आपल्या दुतावासाची बैठक घेऊन तिथल्या नागरिकांना SOP दिल्या आहेत. दोनदा आपण लोकांना काय करायचं आणि काय करु नये ते सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक
आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने व्यवस्था केली आणि लोकांना परत आणलं, हा उपक्रम स्तुत्य आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारशी संपर्क केला होता. एअऱ स्पेस सध्या सुरक्षित नाहीयेत त्यामुळे लोकांना आणण्याची व्यवस्था आपण करत आहोत. एअर लाईन्सची काही विमानं उपलब्ध होत आहेत, एअर इंडियाची विमानंही आपण पाठवत आहोत. असुरक्षित एअर स्पेसमध्ये विमानं जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. तिथे अडकलेले लोक महाराष्ट्रात येऊ शकतील अशी अपेक्षा आहे. हेल्प लाइनही सुरु आहे. दुबईत आमदार मिहिर कोटेचा यांनी जेवणाची व्यवस्था काही ठिकाणी सुरु केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ही मदत केली जाते. परदेशातील भारतीय, विद्यार्थी, पर्यटक यांच्याबाबत मोदी सरकार हे अत्यंत संवेदनशील आहे, लोकांना परत आणण्याचं काम मागच्या पाच ते दहा वर्षांतही केलं आहे. आता सगळ्या लोकांना सुरक्षित आणण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दोन महिने पुरेल इतका इंधन साठा भारताकडे आहे, त्यामुळे लगेच इंधन दरवाढ होईल अशी काही शक्यता नाही. इंधन दर वाढ होऊ नये यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
