पुरावर कायमस्वरूपी तोडग्याची सांगलीकरांना अपेक्षा

वारेमाप पडणारे पाणी अडवून त्याचे नियोजन करण्याची असलेली यंत्रणाही तोकडी ठरली.

दिगंबर शिंदे, लोकसत्ता 

सांगली :  महापुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यात नैसर्गिक संकटावर शास्त्रीय उपाय शोधण्याचे सूतोवाच करून यापुढील काळामध्ये पर्यावरणाचा विचारही महत्त्वाचा ठरण्याची सुचिन्हे दिसत आहेत. महापुराची वारंवारता बदलत्या हवामानाचा परिणाम असून नवीन विकासकामे हाती घेत असताना भूगर्भाचा, नैसर्गिक साधनांचा विचार करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे धोरण यापुढील काळात सर्वानाच स्वीकारावे लागणार आहेत. जर पर्यावरणाचा विचार केला नाही तर ही संकटाची मालिका नित्याची होण्याची चिन्हे आहेत.

हवामान बदलामुळे एका महिन्यात पडणारा पाउस जर चार दिवसांत कोसळला तर आपत्ती येणारच आहेत. पश्चिम घाट आणि कोकणामध्ये पावसाचे पाणी वाहून जाणारी नैसर्गिक साधने म्हणजे, ओढा, नद्या यांची क्षमता कमी झाली असल्याचे दिसून आले. चार दिवसांत प्रचंड पाऊस पश्चिम घाटामध्ये झाला. वारेमाप पडणारे पाणी अडवून त्याचे नियोजन करण्याची असलेली यंत्रणाही तोकडी ठरली. यामुळे महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले. याचबरोबरच डोंगररांगातील भूस्खलनाचे प्रकार वाढले आहेत. डोंगर ठिसूळ बनत असल्याचे दिसून आले.  पावसाच्या सततच्या मारापुढे डोंगरही आपली जागा सोडत असून याचे परिणाम केवळ मानवी जीवनावरच नव्हे तर अवघ्या निसर्गावर होत आहेत.

मानवी हस्तक्षेप जबाबदार

नैसर्गिक आपत्तीला केवळ बदलते हवामान जबाबदार आहे असे नाही. तर विकास कामांच्या  नावावर होत असलेली नैसर्गिक रचना बदलण्याचे जे प्रयत्न मानवी  हाताकडून होत आहेत. याचेही परिणाम होत आहेत. डोंगररांगामध्ये रस्ते तयार करण्यासाठी केली जाणारी वृक्षतोड असो वा खुदाईसाठी वापरले जाणारे जिलेटिन यामुळे दख्खनचे पठार अस्वस्थ झाले आहे. केवळ भूकंपाचे धक्के सहन करणारे दख्खनचे पठार रोजच करण्यात येत असलेल्या जिलेटिनच्या वापरामुळे ठिसूळ बनत चालले आहे. याचेही कमी अधिक परिणाम नैसर्गिक संरचनेत होत आहेत का याचा अभ्यास पर्यावरणप्रेमीबरोबरच भूगर्भ वैज्ञानिकाकडून होण्याची गरज आहे. याचसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी नवीन विकासकामे सुरू करीत असताना तज्ज्ञांकडून साह्य़ घेण्याचे केलेले सूतोवाच भावी पिढीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कृष्णाकाठी असलेल्या अंकलखोप, भिलवडी, डिग्रज या तीन गावांसह सांगली महापालिका क्षेत्रातील बाधित क्षेत्राची पाहणी केली. दोन गावांमध्ये पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना पूरग्रस्तांचे म्हणणेही ऐकून घेतले. नदीकाठची उभी पिके जशी पाण्यात गेली तशीच काही ठिकाणी शेतीही वाहून गेली आहे. भिलवडीची बाजारपेठ तर १० फुटांहून जास्त पाण्यात होती.

आर्थिक फटका

महापुराची वारंवारता लक्षात घेऊन भिलवडीची बाजारपेठ जशी स्थलांतरित करावी लागणार आहे तशीच अवस्था सांगलीची आहे. सांगली शहरातील गणपती पेठ, सराफ कट्टा, हरभट रोड, मारुती रोड, कापडपेठ हा भाग पुराच्या पाण्यात जातो. आणि शहराचीच नव्हे तर जिल्हय़ासह कर्नाटकातील सीमावर्ती जिल्हय़ात या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते. दरवर्षी होणाऱ्या आर्थिक हानीला कंटाळून आता लोकच स्थलांतराचा विचार करतील असे वाटते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या दिशेने सांगितले आहे. पर्याय शोधत असताना ठोक बाजारपेठेसाठी पुरापासून सुरक्षित आणि वाहतुकीची चांगली सोय असलेली जागा शोधावी लागणार आहे. सांगलीतील सहा गल्ल्यामध्ये असलेली बाजारपेठ जर स्थलांतर करायची झाल्यास मिरज पंढरपूर महामार्गावर चांगली जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज लागणार आहे. स्थलांतर करणे एवढे सोपेही असणार नाही. कारण धरण तयार करीत असताना विस्थापित झालेल्यांचे आजही पुनर्वसन योग्य पद्धतीने झालेले नाही याचाही विचार करावा लागणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे पूरग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत होते, निवेदन स्वीकारत होते. मात्र सांगली शहरात भाजप कार्यकर्त्यांनी निवेदन स्वीकारत नसल्याचा आक्षेप घेत घोषणाबाजी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: People of sangli expect a permanent solution to the floods zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या