अलिबाग : पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून खारेपाट विभागातील शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. सहाव्या दिवसांनंतरही उपोषण सुरू आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.

पेण तालुक्‍यातील ५२ गावांतील शेती सिंचनाखाली यावी, तसेच पेण शहरासह येथील गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करता यावा यासाठी हेटवणे येथे धरण बांधण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. सन १९६४ मध्ये धरणासाठी पाहणी करण्यात आली. तर १९९५ मध्ये धरणाचे काम सुरु झाले. तर २००१ मध्ये हे काम पूर्ण झाले आणि प्रत्यक्ष पाणी साठा करण्यास सुरवात झाली. यानंतर सिचनासाठी कालव्यांची काम सुरु होणे अपेक्षित होते मात्र जवळपास २२ वर्षानंतरही कालव्यांची काम पुर्ण होऊ शकलेली नाहीत. सध्या धरणातील पाणी सिडकोमार्फत नवी मुंबई शहर आणि परिसरासाठी वापरले जाते आहे. तर १४७ क्युबिक घनमिटर पाणी वापरा विना पडून आहे.

हेही वाचा… Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : “संसदच सुरक्षित नसेल तर…”, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

पेण तालुक्यातील ५२ गावातील ६ हजार ६०० हेक्टर शेतजमिनी ओलीताखाली यावी यासाठी उजवा तीर कालवा आणि डावा तीर कालवा टाकण्याचे नियोजित करण्यात आले होते. भुमिगत कालव्यांसाठी सिमेंटचे पाईपही आणण्यात आले होते. मात्र काम सुरु होणार तेव्हाच या परिसरात महामुंबई सेझसाठी भुसंपादन सुरु झाले. आणि कालव्यांच्या कामाला ब्रेक लागला. तो लागलाच. सेझ प्रकल्प तर रद्द झाला मात्र जी तत्परता पाटबंधारे विभागाने काम थांबवण्यात दाखवली तीच तत्परता काम सुरु करा असे सांगतांना दाखवली नाही. याचा परिणाम आजही शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचे पाणी काही मिळाले नाही.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या वतीने वाशी येथे बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. सहा दिवसांनंतरही यावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच असून आंदोलकांची प्रकृती खालावली आहे.

राज्यसरकारने हेटवणे धरणाच्या ७६६ कोटींच्या चतुर्थ सुधारीत प्रस्तावास तातडीने मंजूरी द्यावी आणि कालव्यांची कामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्या नंदा म्हात्रे यांनी केली आहे.