scorecardresearch

ट्रक पलटला अन् लोकांची एकच धावपळ; मदत सोडून ऐन श्रावणात पळवले मासे

ट्रक उलटल्यानंतर मासळीने भरलेली थर्माकोलची खोकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या कपाशीच्या शेतात फेकली गेली.

ट्रक पलटला अन् लोकांची एकच धावपळ; मदत सोडून ऐन श्रावणात पळवले मासे

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चोपडा फाट्याच्या उड्डाणपुलाजवळ शनिवारी अपघात झाला. पहाटे पाच वाजता चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक गतिरोधकावर उलटला. या ट्रकमध्ये खोपोली येथून इंदूरला मासळी वाहून नेण्यात येत होती. ट्रक उलटल्यानंतर मासळीने भरलेली थर्माकोलची खोकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या कपाशीच्या शेतात फेकली गेली. श्रावण महिना पाळणारी लोकं महिनाभर मांसाहार करत नाही. मात्र, अपघातस्थळी मासळी पाहताच लोकांनी श्रावण सोडून मासे पळवले.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. परिसरातील गावातील लोक तिथं आले. मात्र, त्यांनी मासळी दिसताच मदत करण्याचं सोडून मासळीवर डल्ला मारला. कपड्यांचे खिसे, लुंगीत मासे भरले. तर काहींनी पिशव्या आणि दुचाकीच्या डिक्कीमध्ये मासे भरले. श्रावण महिना संपायला अवघे दोन दिवस उरले असताना हा अपघात म्हणजे मासळी आवडणाऱ्यासाठी मेजवाणीच ठरला. ज्याला जसे जमेल त्याने आपल्या सोयीप्रमाणे मासळी लांबवली आणि अपघातग्रस्त वाहनाचा चालक मात्र हताशपणे बसून ही लूट बघत होता. कपाशीच्या शेतात पडलेली मासळी लांबवण्याची धावपळ पाहून महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांची करमणूक झाली एवढं मात्र नक्की.

दरम्यान, काही वेळाने सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट, हॉटेल साहसचे संचालक मयूर राजपूत आदींनी घटनास्थळी मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या