सांगली : प्रश्न उपस्थित करून पळून जाण्याचे काम राहुल गांधी, संजय राऊत आदींसारखे करतात. मात्र, देशातील १४५ कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केले. मोदी सरकारची अकरा वर्षे याबाबत मंत्री पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील यांनी मोदी सरकारच्या कारकिर्दीचा आढावा घेताना सांगितले, गेल्या अकरा वर्षांत सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना आहेत. तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. देशाच्या सीमा मजबूत केल्या. तसेच तंत्रज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.
मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. याचबरोबर अत्याधुनिक यंत्रणांच्या निर्मितीत देश आत्मनिर्भर झाला. देशातील शस्त्रास्त्र निर्यात ३४ पटीने वाढून २३ हजार ६२२ कोटींवर पोहचली. नक्षलग्रस्त भागाचा विकास करून नक्षलमुक्तीच्या दिशेने निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. हरघर जल, निवास योजना या माध्यमातून सामान्यांच्या गरजेच्या योजनांना केंद्र सरकारने अग्रस्थान दिले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते सरकारच्या हेतूबाबत प्रश्न उपस्थित करतात, याबाबत विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, गांधी, राऊत यांच्यासारखे लोक प्रश्न उपस्थित करतात आणि पळून जातात. १५ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री आणि सलग ११ वर्षे देशाचे पंतप्रधान पद भूषविणारे नरेंद्र मोदी लोकशाही राष्ट्रातील एकमेव नेतृत्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.