जिल्ह्य़ातील ९ मतदारसंघांत २ हजार ७४७ केंद्रांवर ६९.३३ टक्के मतदान झाले. सिल्लोडमध्ये सर्वाधिक ७५.२६ टक्के मतदान झाले. पैठण, फुलंब्री व वैजापूरमध्ये ७० टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले. दरम्यान, मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने झुकणार, या अंदाजाबाबत शर्यती सुरू झाल्या आहेत.
९ मतदारसंघांत २४ लाख ८८ हजार ३५१ पैकी १७ लाख २५ हजार १२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ९ लाख ४६ हजार ७७६ पुरुष व ७ लाख ७८ हजार ३४९ महिलांनी मतदान केले. शहरातील तिन्ही मतदारसंघांत तुलनेने कमी मतदान झाले. औरंगाबाद पूर्वमध्ये १ लाख ७४ हजार ६०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण ६६.७१ टक्के आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये ६४.३३, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघात ६५.१८ टक्के मतदान झाले. गंगापूर व कन्नड या दोन मतदारसंघांत ७० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान मात्र होऊ शकले नाही.
मतदानाच्या टक्केवारीवरून निकालाचे अंदाज नव्याने वर्तवले जात आहेत. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतदान केंद्रनिहाय आपल्याला किती मतदान मिळू शकते, याचा गुरुवारी आढावा घेतला. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पुन्हा निवडून येण्याचा दावा केला. शहरातील ३ मतदारसंघांपैकी १ जागा एमआयएमकडे जाऊ शकेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. विशेषत: मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण व विभाजन हा प्रमुख निकष मानून निकालाची भाकिते वर्तवली जात आहेत. मोदी लाट होती का, याचीही चर्चा नव्याने सुरू झाली आहे. विशेषत: तरुण मतदारांचा वाढलेला सहभागही सांगितला जात आहे. एमआयएमचे डॉ. गफार कादरी यांना मिळणाऱ्या मतांचा व काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या जय-पराजयाचा संबंध चर्चेत जोडला जात आहे. बहुतांश मतदारसंघांत चुरशीची लढत झाली.