scorecardresearch

खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट

मान्सूनचा पाऊस लांबल्याने खरीप हंगाम पुन्हा अडचणीत सापडला आहे. जूना महिना कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. खरीप पेरणीस सज्ज झालेला शेतकरी आता पाऊस कधी पडेल, याच एका आशेवर आहे.

मान्सूनचा पाऊस लांबल्याने खरीप हंगाम पुन्हा अडचणीत सापडला आहे. जूना महिना कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. खरीप पेरणीस सज्ज झालेला शेतकरी आता पाऊस कधी पडेल, याच एका आशेवर आहे. जिल्हय़ातील जवळपास सर्वच तलाव आटले असून, महत्त्वाच्या धरणांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाईही मोठय़ा प्रमाणात भेडसावण्याची शक्यता आहे.
जिल्हय़ात जूनच्या पहिल्या आठवडय़ात पडलेल्या पावसानंतर जूनच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत वरुणराजा बरसलाच नाही. पूर्ण महिना कोरडा गेल्याने शेतकरी चिंताक्रांत आहेत. जिल्हय़ातील अनेक लघु, मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. मांजरासारख्या मोठय़ा धरणांनीही तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे.
जिल्हय़ात सध्या १७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माजलगाव, िबदुसरा धरणांनी तळ गाठला आहे. भूगर्भातील पाणीपातळीतही लक्षणीय घट झाली आहे. पाच लाखपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पावसाअभावी खोळंबली आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळाची झळ सोसणाऱ्या बीड जिल्हय़ास आताही दुष्काळाची धग सहन करावी लागणार काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
जालन्याच्या २४ गावांना ३१ टँकरने पाणीपुरवठा
वार्ताहर, जालना
पावसाअभावी जालना जिल्ह्य़ात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्य़ातील २४ गावे आणि ८ वाडय़ांना ३१ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
जालना ५, बदनापूर ६, जाफराबाद १, अंबड ११ आणि घनसावंगी १ याप्रमाणे टँकर सुरू आहेत. भोकरदन, परतूर व मंठा तालुक्यांत अजून टँकर सुरू नाही. खासगी १७, तर अन्य १४ टँकरमार्फत पाणीपुरवठा होत आहे. ३५ विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. जिल्ह्य़ात सात मध्यम प्रकल्पांतील सरासरी जलसाठा दहा टक्के आहे. जिल्ह्य़ातील ५७ लघु पाटबंधारे प्रकल्पांतील जलसाठा ५ टक्के आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुख्यमंत्र्यांनी शुक्र वारी जालना जिल्ह्य़ातील पाऊस, पेरणी आणि संबंधित बाबींचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्य़ात उद्भवणाऱ्या परिस्थितीची माहिती दिली.
हिंगोलीतील १४ तलावांत केवळ २५ टक्के पाणीसाठा
वार्ताहर, हिंगोली
जून महिना पावसाअभावी कोरडाच गेल्याने जिल्हय़ात महत्त्वाच्या तलावांतील पाणीसाठे जोत्याच्या खाली गेले आहेत. जिल्ह्यात ३ धरणांसह २६ लघु प्रकल्प असून, १२ तलावांतील पाणी जोत्याच्या खाली, तर १४ तलावांत २५ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, सिद्धेश्वर धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून, यलदरी ४३.०९ व इसापूर धरणात २५.७८ टक्के साठा आहे.
पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. िहगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. इसापूर धरणातून कळमनुरी, बाळापूर भागात पाणीपुरवठा होतो. इसापूर धरणात ४५.७८ टक्के पाणीसाठा आहे. यलदरी धरणाची क्षमता मृतसाठा १२४.६७७ दलघमी, जिवंत साठा ८०९.२६३ दलघमी (एकूण ९२३.९४ दलघमी), आजमितीला उपलब्ध पाणीसाठा ४३.०९ टक्के आहे. यात मृतसाठा १२४.६७७ दलघमी, जिवंत साठा ३४८.७४५ दलघमी असा एकूण ४७३.४२२ दलघमी साठा आहे. सध्या कळमनुरीच्या साईनगरमध्ये एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर िहगोली तालुक्यातील बळसोंड परिसरात टँकरची मागणी जोर धरत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Peril of drought beed