कोल्हापूरमध्ये आज (२१ नोव्हेंबर) वेळेत आले असतानाही अनेक परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडलाय. महा टीईटी परीक्षा (Maha TET Exam) देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी परीक्षा केंद्र दाखल झाले. मात्र, परीक्षा केंद्रांवर घडलेल्या प्रकाराने त्यांना या कटू अनुभवांना सामोरे जावे लागले.

गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचण्यासाठी अडचणींचा मुकाबला करावा लागत आहे. याही परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी खासगी वाहनांना अधिक रक्कम मोजून परीक्षा केंद्र गाठले. मात्र, परीक्षा केंद्रावर प्रवेशच नाकारल्यानं त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जिल्ह्यातील ३४ केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी १७ हजार विद्यार्थी आले आहेत. पहाटेपासूनच त्यांची परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठीची गडबड धावपळ सुरू होती. मात्र त्यांना परीक्षा केंद्रावर उशिरा पोचल्याचे कारण देत प्रवेश नाकारण्यात आला.

वेळेआधीच परीक्षा केंद्र अगोदरच बंद केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

विद्यार्थ्यांनी आपण वेळेवर आलो होतो, पण परीक्षा केंद्र अगोदरच बंद करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यावरून विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. मुस्लीम बोर्डिंग, विवेकानंद कॉलेजवर देखील असाच प्रकार घडला. अधिकाऱ्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचे सांगण्यात आले. प्रवेश नाकारून उमेदवारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

हेही वाचा : CBSE आणि CISCEच्या बोर्ड परीक्षा पद्धतीत महत्त्वाचे बदल; विद्यार्थ्यांनी केली ‘ही’ मागणी

वेळेवर उपस्थित राहणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, असे काही अधिकाऱ्यांनी म्हटलं. यावर एवढ्या कडक नियमांची अंमलबजावणी करणारे आपल्या कार्यालयात तरी वेळेवर पोहचतात का? असा संतप्त सवाल पालक व विद्यार्थ्यांनी केलाय. जिल्ह्यात सगळीकडे हा गोंधळ सुरू आहे. गेल्या महिन्यात ही आरोग्य विभागाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारच्या कटू अनुभवाला तोंड द्यावे लागले होते.