वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांभोवतीचा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडीचा) फास आणखीन घट्ट झालाय. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने ही अटक केलीय. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा खान यांच्या वकीलांनी केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गवळी यांच्या चौकशीहीची शक्यता
सईद खान यांना अटक केल्यानंतर त्यांचे वकील इंद्रापल सिंह यांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय. खान हे ईडीकडून देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याबरोबरच तपासात सहकार्य करत असतानाही ही अटक करण्यात आल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केलीय. या अटकेमुळे गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आलीय त्याच कंपनीमध्ये गवळी या निर्देशक म्हणजेच डायरेक्टर होत्या. त्यामुळे आगामी काळामध्ये गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये गवळी यांच्यासंदर्भातील हे दुसरे प्रकरण आहे ज्यामध्ये ईडीने कारवाई केलीय.

यापूर्वीही गावळींच्या निकटवर्तीयांना ईडीने पाठवलेल्या नोटीस
३० ऑगस्ट रोजी ईडीने वाशीम जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या गवळी यांच्या संस्थांमध्ये झडती घेतली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर १०० कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला आहे. या धाड सत्रानंतर गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलेली. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधित दोन व्यक्तींना ईडीने समन्स पाठवले होते. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले होते. दोघांनाही ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहावे असं या समन्समध्ये म्हटलं होतं. मात्र या दोन्ही व्यक्तींनी खासगी कारण देत आपल्याला ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसांचा अवधी घ्यावा अशी मागणी ६ सप्टेंबर रोजी केली होती.

काय आहे हे प्रकरण?
वाशीम जिल्हय़ातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला आहे. सन २०१९ मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. ७ जुलै २०१९ रोजीच्या चोरीची तक्रार १२ मे २०२० रोजी करण्यात आली. १० महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय?, त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले? असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. मुंबई येथील ईडीची पथके रिसोड येथे ३० ऑगस्ट रोजी सकाळी दाखल झाली. भावना गवळींच्या रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी.फॉर्म महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन या संस्थांमध्ये धाडी टाकण्यात आल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person associated with shiv sena leader bhavana gawali compony arrested by ed scsg
First published on: 28-09-2021 at 10:00 IST