नवी मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून एपीएमसी बाजार समितीत ७ संचालकांवरील अपात्रतेची टांगती तलवार, सभापती उपसभापतींचा राजीनामा त्यानंतर संचालक मंडळ कोरम पूर्ण नसल्याने बैठका ठप्प, परिणामी विकास कामांचा खोळंबा यामुळे बाजार समिती चर्चेचा विषय बनली आहे.
सभापती उपसभापती यांनी राजीनामा दिला, तसेच अपात्र संचालकांमुळे मंडळाचे कोरम पूर्ण होत नसल्याने बैठका घेता येणार नाहीत, या बाजार समितीच्या नियमांमुळे एपीएमसीतील मान्सूनपूर्व कामे, अनुज्ञप्ति नूतनीकरण इत्यादी कामांचा खोळंबा झाला आहे. आता कोरम पूर्ण होत असूनही बाजार समिती संचालक मंडळाची बैठक घेत नसल्याने या विरोधात न्यायालयात संचालक मंडळाने याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : महापालिकेचे ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालय नवजात शिशूंसाठी ठरतंय वरदान
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती आणि उपसभापती यांच्यासह ७ संचालक अपात्र ठरले आहेत. या विरोधात हे संचालक न्यायालयात गेले होते. तसेच दरम्यानच्या कालावधीत पणन मंत्र्यांनी सुनावणी होईपर्यंत या आदेशाला स्थगिती दिली होती. पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावणी घेऊन निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने ४ संचालकांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या संचालकांना न्यायालयाने मुदतवाढ दिली असून, या ६ आठवड्यात पणन विभागाने निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान एपीएमसी नियमानुसार संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होत असून, बैठका घ्याव्यात, अशी मागणी संचालकांनी एपीएमसीकडे केली आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : बाजारात रसाळ फळांची मागणी वाढली, ग्राहकांची कलिंगड, द्राक्षाला अधिक पसंती
सदस्यांमधून आवश्यक असणारी १० (९+१) गणपूर्तीची पुर्तता आहे. तसेच बाजार समितीच्या समिती सदस्यांची सभा यापूर्वी दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेली असून, उपविधीतील तरतुदीनुसार दोन सभेतील अंतर ६० दिवसांपेक्षा जास्त नसावे, मात्र ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. सदस्य समितीची सभा आयोजित करण्याबाबत सचिवांना वारंवार पाठपुरावा करूनही सचिवांनी सभा आयोजित केलेली नाही. त्यामुळे बाजार आवारातील कामकाज ठप्प झालेले असून, यामुळे बाजार आवारातील बाजार घटकांच्या ७५०० अनुज्ञप्ति नुतनीकरण, विविध विकास कामे व मान्सूनपूर्व कामे, तसेच दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे एपीएमसीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून सभापती निवडणूक आणि कोरम पूर्ण होत असल्याने सदस्य सभा घ्याव्यात अशी मागणी केली आहे, असे मत कांदा बटाटा संचालक अशोक वाळुंज यांनी व्यक्त केले आहे.