मुंबई : आखाती युद्धामुळे इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना पेट्रोल, डिझेलचा झालेला तुटवडा हा औद्योगिक व घाऊक व्यापाऱ्यांकडून पेट्रोलपंपांवरून केलेल्या इंधनखरेदीमुळे झाल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. औद्योगिक व घाऊक व्यापाऱ्यांनी तेलकंपन्यांकडून इंधन खरेदी करणे बंधनकारक असताना त्यांनी पेट्रोलपंपांवरून इंधन खरेदी केली, यामुळे हा तुटवडा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे मे महिन्यात पेट्रोलच्या मागणीत १८.५४ टक्के आणि डिझेलच्या मागणी तब्बल २२.३ टक्के वाढ झाल्याचे सरकारने कबुल केले. यापुढे घाऊक ग्राहकांनी पेट्रोलपंपांवर इंधन खरेदी केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिला आहे.

इंधन खरेदी-विक्रीतील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने पावले उचलली आहे. त्यासाठी सरकारने हालचाली सुरू करताच साठेबाजीचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये घाऊक औद्योगिक ग्राहक हे तेल कंपन्यांच्या डेपोऐवजी किरकोळ पेट्रोल व डिझेल विक्री केंद्रांवरून मोठ्या प्रमाणावर डिझेलची खरेदी केल्याच्या घटना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आल्या. मुळे किरकोळ ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या उपलब्ध इंधन साठ्यावर ताण येत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने मान्य केले आहे.

तेल उद्योग राज्यस्तरीय समन्वयक विभागाकडील आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यावर्षीच्या मे महिन्यात पेट्रोलच्या मागणीत १८. ५४ टक्के आणि डिझेलच्या मागणीत २३. ३ टक्के वाढ झाली आहे तर घाऊक डिझेलच्या खरेदीत घट झाली आहे. याचा अर्थ पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणावर व्यापारी डिझेलची खरेदी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता पेट्रोल पंपावरील इंधनाच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत.

घाऊक ग्राहकांना पेट्रोल डिझेलची आवश्यक्ता असल्यास त्यांनी तेल वितरण कंपन्यांच्या थेट विक्री आणि घाऊक विक्री यंत्रणेकडून इंधनाची खरेदी करावी. तेलकंपन्यांच्याच डेपोवरून त्यांनी खरेदी करावी, पेट्रोल पंपांवरून खरेदी केल्यास कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. त्यांच्यावर पेट्रोलियम पदार्थ विक्रीच्या विविध कायद्यांनुसार कारवाई करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.