कराड : कॅमेरा आणि ऑप्टिकल उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या ‘निकॉन’ या जपानी कंपनीने कराडचे युवा छायाचित्रकार कल्पेश पाटसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवंत व्यक्तिरेखा साकारून, त्यांच्या छायाचित्रांतून बनवलेली ‘संतांची मांदियाळी’ ही छायाचित्र मालिका आपल्या ‘इन्स्टाग्राम’वर प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्राची सांकृतिक अन् धार्मिक परंपरेची धुरा वाहणाऱ्या वारकरी संप्रदायाचा सर्वांत मोठा उत्सव असलेल्या आषाढी एकादशी आणि त्या निमित्ताने निघणाऱ्या असंख्य दिंड्या, त्यांची परंपरा, त्यातील हजारो वारकऱ्यांचा अमाप उत्साह, वेगळेपण याची एकच चर्चा सर्वदूर होत असते. या साऱ्या उत्सवाचे सचित्र दर्शन घडविण्याचे काम कराडमधील काही हौशी कलाकारांनी स्वयंस्फूर्तीने केले आहे. पाटसकर हे दोन दशकांहून अधिक काळ हौशी व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम पाहत आहेत. छायाचित्रीकरणाचा व्यासंग, त्यात नवनवे प्रयोग करण्याचा छंदही त्यांनी जोपासला.
अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाचे कामही हाती घेण्यात आले. ही जणू संधी मानून कल्पेश पाटसकर व त्यांचे सहकारी सर्वेश उमराणी, शंतनू देशमुख, आसावरी पंडित, गणेश गायकवाड आदी ८० जणांच्या दिनदर्शिका समूहाने ‘श्रीराम’ ज्या भूमिकेतून आदर्श ठरले ते त्यांच्या पुत्र, बंधू, शिष्य या जिवंत व्यक्तिरेखा त्या प्रसंगाची उभारणी करून आपल्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध केल्या. या छायाचित्रांची पुढे दिनदर्शिका बनवण्यात आली. त्यातील उत्पन्न श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाकडे सुपूर्द करण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तही क्रांतिकारकांच्या अशाच जिवंत व्यक्तिरेखा साकारून त्या चित्रबद्ध करून त्याचीही दिनदर्शिका बनवण्यात आली. त्यालाही मोठा प्रतिसाद लाभला.
कराड अर्बन बँकेच्या माध्यमातून चालू वर्षी संतांची मांदियाळी ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. ती याच दिनदर्शिका समूहाने बनवली आहे. त्यात संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत जनाबाई, संत सखुबाई, संत सावता माळी, संत गोरा कुंभार अशा संतमंडळींच्या जिवंत व्यक्तिरेखा साकारून, त्यांची छायाचित्रे या दिनदर्शिकेत आहेत. ही दिनदर्शिका अतिशय आकर्षक व मनाला भावणारी आहे. त्यामुळेच याची दाखल घेऊन नामांकित निकॉन कंपनीने आपल्या इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ‘संतांची मांदियाळी’ दिनदर्शिकेतील छायाचित्रांची मालिकाच प्रसिद्ध केली आहे. या संदर्भात बोलताना, कल्पेश पाटसकर यांनी समाधान व्यक्त करून असे उपक्रम राबवण्यास आणखी बळ मिळाल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.