औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तांतर घडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली होती. पण त्यानंतर १६ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यावरून एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी आंदोलनं देखील केली आहेत. आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. ‘बार अँड बेंच’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! आता गुगल मॅपवरही औरंगाबादच्या जागी दिसणार ‘संभाजी नगर’

औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयात काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन जणांनी वैयक्तिक पद्धतीने याचिका दाखल केली आहे. २००१ मध्ये औरंगाबाद शहराचं नामकरण करण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडला होता, असं संबंधितांनी याचिकेत म्हटलं आहे.