संगमनेर: पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील एका बड्या व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पळून जात असलेल्या टोळीला संगमनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीतील पाचही आरोपी उत्तर भारतीय असून अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेरमधील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर पहारा बसवत पोलिसांनी टोळीला अटक केली.
चंद्रशेखर दीपकचंद्र गौड (वय ३४), दिलीप मोहनलाल सरोज (वय २८), रिंकू अलगुराम सरोज (वय १७), अनिल गिरीधारीलाल सरोज (वय २६) आणि मुकेशकुमार राममुदर चव्हाण (वय २४) या पाच जणांना पोलिसांनी अटक करत अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुटका केली. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्रांसह मोबाईल आणि कार हस्तगत करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ११ लाख २८ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी दिली.
या खळबळजनक प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने ( युपी -७०- एचआर – ९२७२) आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे मिळाली. त्यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला याबाबत माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले.
वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पुणे-नाशिक मार्गावरील संगमनेर तालुक्याच्या हद्दीतील हिवरगाव पावसा टोलनाका येथे सापळा रचला. त्याचवेळी संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी खांडगाव फाटा येथेही अतिरिक्त नाकाबंदी केली होती. काल, सोमवारी रात्री ११ च्या सुमारास संशयित मोटार टोलनाक्यावर येताच पोलिसांनी तिला चहुबाजूंनी वेढले.
कारची झडती घेतली असता त्यामध्ये वरीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला. या टोळीविरुद्ध पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे, सुनील ढाकणे, संतोष फड, शांताराम मालुंजकर तसेच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
