Pimpri Chinchwad Woman Palkhi Video: आषाढी वारीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांंनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पालखी आणि पायीवारीत मोठ्या संख्येने वारकरी होणाऱ्या वारकऱ्यांचा विचार करता पालखी मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पण, वाहतूक बदलाला न जुमानता एका महिलेने पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांशी हुज्जत घातली एवढेच नव्हे तर रस्त्यात झोपून धिंगाणा घातला आणि अखेर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स उडवून कार घेऊन गेली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
महिलेची पोलिसांशी हुज्जत
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांनी बुधवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पालखी पुण्याच्या दिशेने येणार असल्याने पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पालखी मार्गासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला असताना एका महिलेने पोलिसांशी हुज्जत घातली. शेवटी वाहतूक नियोजनासाठी पोलिसांकडून उभारण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून महिलेने कार थेट पालखी मार्गावर घुसवल्याने काही काळ सुरक्षा व्यवस्थेत गोंधळ उडाला.
व्हायरल व्हिडीओ काय आहे?
संबंधित महिला पोलिसांना, “फक्त तुमचेच काम महत्त्वाचे आहे का? मला लोकांना ड्रायव्हिंग शिकवायचे आहे. त्यांचे पैसे घेतले आहेत. मला जाऊ द्या, हवं तर मला जेलमध्ये टाका,” असे म्हणत वाद घालत होती. काही वेळ निषेध म्हणून महिला रस्त्यावरही झोपली. त्यानंतर कारमध्ये बसून तिने पोलिस बॅरिकेड तोडले आणि पोलिसांच्या वारंवार इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत पालखी मार्गावर कार घुसवली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती बॅरिकेड ओलांडल्यानंतरही भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये बंदोबस्तासह बॅरिकेडिंग करण्यात आले होते. त्यावेळी ड्रायव्हिंग स्कूल चालवणारी एक महिला कार घेऊन पालखी मार्गावरून जाण्याचा आग्रह धरत होती. पोलिसांनी तिला वाहतूक निर्बंधांची माहिती देत पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितले. मात्र, यावरून तिची पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आळंदी पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
