सावंतवाडी : मालवण तालुक्यातील आचरा-पिरावाडी येथील ‘गोल्डन बीच’वर निसर्गाचा अनोखा सोहळा नुकताच पार पडला. कासवमित्र सूर्यकांत धुरी यांच्या संवर्धन केंद्रातून बाहेर पडलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या ५५ कासवांच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. आचरा समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनाची ही परंपरा यंदाही उत्साहात सुरू आहे.

​पिरावाडीचे पोलीस पाटील सौ. तन्वी जोशी आणि ग्रामपंचायत सदस्य सौ. पूर्वा तारी यांच्या हस्ते या चिमुकल्या पाहुण्यांना लाटांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी आचरा पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल तन्वी माणगावकर, प्रज्ञा गावकर, होमगार्ड विनय घाडीगावकर, ग्रामस्थ अरुण नावगे, नंदा नावगे यांच्यासह मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते.

​आचरा किनारा कासवांसाठी सुरक्षित

यावेळी माहिती देताना पिरावाडीचे कासवमित्र तथा बीच मॅनेजर सूर्यकांत धुरी म्हणाले की, “चालू हंगामात आतापर्यंत १०० कासवांच्या पिल्लांना समुद्रात यशस्वीरीत्या सोडण्यात आले आहे. विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी आचरा समुद्रकिनाऱ्याला कासव जास्त पसंती देत आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. हा किनारा त्यांना सुरक्षित वाटत असून, त्यांच्या संवर्धनासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”

​गेल्या अनेक वर्षांपासून सूर्यकांत धुरी यांनी आचरा परिसरात कासव संवर्धनाचे कार्य व्रत म्हणून जोपासले आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पर्यटकांनाही हा नैसर्गिक सोहळा जवळून अनुभवता येत आहे.