कलाकेंद्रात झटापट व पलायननाटय़ या गोंधळात पिस्तूल गहाळ झाले. या पिस्तुलानेच कलाकेंद्रातील नांदेड पोलिसांची मौजमस्तीही चव्हाटय़ावर आली! दोन दिवस पोलिसांनीच या बाबत कमालीची गुप्तता पाळल्यानंतर रविवारी मात्र हा प्रकार उजेडात आला. या प्रकरणात नांदेड पोलिसांची बेअब्रू वेशीवर टांगली गेली. अखेर या प्रकरणास कारण ठरलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
बंडू कलंदर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून नांदेडच्या पोलीस उपअधीक्षकांचा तो अंगरक्षक असल्याची माहिती समोर आली. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा कलाकेंद्रात गेल्या १० डिसेंबरला हा प्रकार घडला. या घटनेतील पिस्तूल दोन दिवस शोधाशोध केल्यानंतर हिंगोली पोलिसांच्या ताब्यात असल्याचे नांदेड पोलिसांना कळले. हे पिस्तूल ताब्यात घेण्यास नांदेडचे पोलीस शनिवारी संध्याकाळी हिंगोलीत आले. त्यावेळी या सर्व प्रकारावर लख्ख उजेड पडला.
वारंगाफाटा कलाकेंद्रावर नाचगाणे व लावणीचा आनंद लुटण्यास अनेक वजनदार मंडळी हजेरी लावतात. त्यामुळे या कलाकेंद्राचे नाव मराठवाडाभर प्रसिद्ध आहे. १० डिसेंबरला या केंद्रावर काही मंडळी मौज लुटण्यास आली होती. या वेळी तेथे दोन गटांत वाद निर्माण झाला. वाद घालणाऱ्यांत नांदेडचे पोलीसही होते. सुरुवातीला शाब्दिक चकमक होऊन वाद विकोपाला गेला. वाद हातघाईवर आल्याने केंद्रावरील एकाने बाळापूर पोलिसांना कळविले. आखाडा बाळापूर पोलीस तात्काळ वारंगाफाटा येथे पोहोचले.
घटनास्थळी पोलीस आल्याचे पाहून तेथील सर्वाची पळापळ झाली. या वेळी तेथे आखाडा बाळापूर पोलिसांना हे पिस्तूल सापडले. या बाबत बाळापूर पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद केली व पिस्तूल मालकाचा शोध सुरू केला. नांदेड पोलिसांनीही गहाळ पिस्तुलाचा शोध सुरू केला. बाळापूर पोलीस या बाबत गुप्तता पाळून होते. कलाकेंद्रावर घडलेल्या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, नांदेड पोलिसांना पिस्तूल आखाडा बाळापूर येथे असल्याचे कळाल्याने ते पिस्तूल ताब्यात घेण्यास येथे पोहोचले. त्यानंतर या प्रकरणाला जाहीर तोंड फुटले.
या पिस्तुलावरून आता उलटसुलट चर्चा झडू लागली आहे. वास्तविक, वारंगाफाटा हे ठिकाण आखाडा बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येते. नांदेड पोलिसांची हद्द पार्डीजवळच संपत असताना नांदेड पोलीस कर्मचाऱ्याचे वारंगाफाटा कलाकेंद्रावर येण्याचे नेमके प्रयोजन काय? कलाकेंद्रासमोर झालेली झटापट नेमकी कोणात व कशासाठी होती? झटापटीत पिस्तूल गहाळ झाल्याचे त्या पोलिसाला कळले नाही काय? या पिस्तुलामुळे काही विपरीत घडले असते, तर त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.