मुंबई : महाराष्ट्रात खरी शिवसेना एकच असून उलट जे दोन-तीन राहिले आहेत त्यांच्यावर अधिकृत शिवसेनेने शिस्तभंगाची कारवाई करायला हवी, असा टोला केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तपपूर्तीनिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील ९ पैकी ६ खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. दोन्ही शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या या उलथापालथीविषयी भाजपने आतापर्यंत फारसे भाष्य केले नव्हते. मात्र गोयल यांनी, ऑपरेशन टायगरविषयी बोलताना केलेल्या या टिपण्णीमुळे शिवसेना निष्ठावंतांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.
खरी शिवसेना एकच असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खासदार पुन्हा आपल्या घरी येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. उलट अधिकृत शिवसेनेने जे दोन-तीन राहिले आहेत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा टोमणा गोयल यांनी विरोधकांना मारला.
९५ टक्के जरी पाऊस पडला काळजी नाही
मान्सून लांबल्याने महाराष्ट्रासह देशभर दुष्काळाचे सावट आहे. त्याकरिता केंद्राने काय तयारी केली आहे, याविषयी विचारले असता गोयल म्हणाले की, एल निनोचा परिणाम जाणवणार आहे. हवामानातील बदलामुळे पावसाचे आगमन लांबेल असा अंदाज आहे. मात्र, उशीरा का होईना मान्सून गती घेईल, अशी अपेक्षा आहे. सरासरीच्या ९५ टक्के जरी पाऊस पडला काळजी करण्याची गरज लागणार नाही. अर्थात या सर्व घडामोडींवर केंद्र सरकारचे लक्ष आहे.
विदा केंद्रांतील गुंतवणूकीत महाराष्ट्र आघाडी घेईल
महाराष्ट्र आणि त्यातही मुंबई विदा केंद्रांमधील गुंतवणुकीकरिता अनुकूल क्षेत्र आहे. कारण विदा केंद्राकरिता लागणाऱ्या ‘लँडिंग केबल’ (समुद्राच्या तळावरून एक देश दुसऱ्या देशाला जोडणाऱ्या अति-हायस्पीड फायबर ऑप्टिक केबल्स) भारतात मुंबईसारख्या किनारपट्टी शहरांवरून येतात. या विषयीचे राज्याचे धोरणही सकारात्मक आणि पुढारलेले आहे. भविष्यात या केंद्रांमधील गुंतवणुकरिता राज्यांमध्ये स्पर्धा असेल. परंतु, भौगोलिक अनुकूलता आणि सकारात्मक धोरण यांमुळे लाखो कोटींची गुंतवणूक होऊन महाराष्ट्र आघाडी घेईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
