रुग्णसेवेला हक्काची जागा

इमारत अनेक वर्षांपासून मोडकळीस आल्याने अशा धोकादायक इमारतीमध्ये दवाखाना व रुग्णालय भरवणे जिकिरीचे झाले होते.

|| नीरज राऊत

बोईसरच्या संजयनगर परिसरात ६० ते ७५ गुंठे मंजूर; ५० खाटांच्या रुग्णालयाचा मार्ग सुकर

पालघर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाला अखेर शासकीय जमीन गवसली आहे. सरावली येथील संजयनगर परिसरात ६० ते ७५ गुंठे जागा उपलब्ध असून त्या ठिकाणी ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

नवापूर रोड येथे एका भाड्याच्या जागेत बोईसर येथील ग्रामीण रुग्णालय कार्यरत होते. ही इमारत अनेक वर्षांपासून मोडकळीस आल्याने अशा धोकादायक इमारतीमध्ये दवाखाना व रुग्णालय भरवणे जिकिरीचे झाले होते. ही बाब अनेकदा शासनाच्या निदर्शनास आणल्यानंतर हे रुग्णलाय तारापूर येथे स्थलांतरित करण्यात आले. बोईसर येथे ग्रामीण रुग्णालयासाठी चित्रालयसमोरील शासकीय जमीन विचाराधीन असताना या जागेच्या मालकीविरुद्ध बीएआरसीने न्यायालयात दाद मागितली आहे. तर बेटेगाव येथे सुचवलेली अन्य जागा मध्यवर्ती ठिकाणी नसल्याने त्या जागेचा विचार बारगळला.

सरावली महसूल हद्दीमध्ये संजयनगर परिसरात सर्व्हे नंबर १०४/१अ मधील मोकळ्या असलेल्या शासकीय भूखंडावर ग्रामीण रुग्णालय उभारण्याबाबत लोकसत्ताने प्रस्ताव मांडला होता. या प्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर प्रथम तहसीलदार सुनील शिंदे व नंतर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी स्थळ पाहणी करून या जागेबाबत अनुकूलता दर्शवली आहे.

या शासकीय जमिनीची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली असून वन विभागानेदेखील हे क्षेत्र राखीव व संरक्षित वन अथवा संपादित वन नाही, तसेच क्षेत्र कांदळवनबाधित नाही, इत्यादी बाबी तपासून अभिप्राय महसूल विभागाला कळवला आहे. या ठिकाणी ५० खाटांचे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे निश्चित झाले असून रुग्णालयाचा आराखडा बनवण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

पालघर आरोग्य पथक आवारातील नवीन इमारत प्रतीक्षेत

पालघर आरोग्य पथक कार्यरत असणारे माता बाल संगोपन केंद्र व लसीकरण केंद्राची इमारत धोकादायक झाल्याने हे केंद्र इतरत्र स्थलांतरित करण्याची गेल्या काही वर्षांपासून मागणी होत आहे. सर जे.ज. रुग्णालय समूहाच्या आवारात जुनी कर्मचारी निवास व्यवस्था मोडकळीस आली असून त्या जागी नवीन इमारती उभारण्याची जिल्हा प्रशासनाने तयारी दाखवली होती. जिल्ह्याला कोविडअंतर्गत प्राप्त झालेला निधी शिल्लक असल्याने त्यामधून इमारत उभारणीसाठी प्रस्तावित असताना वैद्यकीय शिक्षण विभागाकडून याकामी ना हरकत दाखला प्राप्त न झाल्याने हे काम लांबणीवर पडले आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या आरोग्य पथक व माता बाल संगोपन केंद्राची इमारत जमीनदोस्त करून ती नव्याने उभारली जाणे अपेक्षित आहे.

‘सीएसआर’ फंडातून उभारणी

ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी लागणारा निधी येथील उद्योग समूहांच्या किंवा तारापूर अणुऊर्जा आयोगाच्या सामाजिक दायित्व फंडातून (सीएसआर) देण्याबाबत काही प्रस्ताव महसूल विभागाकडे प्राप्त झाले आहेत. या रुग्णालयासाठी लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून घेण्याऐवजी सीएसआरमधून करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Place of claim to patient care akp