Ajit Pawar Death News: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनेही या अपघाताची माहिती देत असताना अजित पवार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह आणखी सहा जण होते. अपघातानंतर या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अजित पवारांचे बारामतीवर विशेष प्रेम होते, त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा, हे खूप दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

सदर विमान हे व्हीएसआर कंपनीचे खासगी विमान होते. यात एकूण पाच प्रवाशांचे नाव समोर आले आहे. अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असल्याची माहिती समोर आली. मुंबईतून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेकऑफ घेतले होते. तर बारामतीमध्ये ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होणार होते.