नांदेड : नांदेड विभागातील अतिरिक्त उसाचे गाळप येत्या २५ मे पूर्वी करण्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या एका बैठकीत  देण्यात आली. मराठवाडा विभागात यंदा अद्यापही लाखो टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत असून या भागातील ऊस अन्य भागात नेऊन गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या धावत्या दौऱ्यावर आलेल्या सहकारमंत्री पाटील यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहात विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती.

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम, जिल्हा उप निबंधक डॉ. मुकेश बाराहाते, प्रादेशिक सह संचालक साखर सचिन रावळ या वेळी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा बँकेमार्फत झालेले पीककर्ज वाटप, बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या इतर सुविधा तसेच अवैध सावकारी संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी, बाजार समित्यांच्या आगामी निवडणुका, जिल्ह्यातील हरभरा खरेदी यावरही चर्चा झाली. बाजार समित्यांच्या निवडणुका वेळेवर घ्या, तसेच या संस्थांनी उत्पन्न वाढविण्यासाठी, शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेशही सहकारमंत्री पाटील यांनी दिले. दरम्यान भाऊराव चव्हाण कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. पाटील यांनी याला दुजोरा दिला असून आमच्या दोन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे पूर्ण गाळप निर्धारित मुदतीत होईल, असे स्पष्ट केले.

जिल्ह्यासाठी एकच सहकार संकुल

सहकार विभागाशी संबंधित वेगवेगळी कार्यालये नांदेड शहरात वेगवेगळय़ा इमारतींमध्ये कार्यरत आहेत. या सर्व कार्यालयांचा कारभार एकाच इमारतीतून व्हावा, यासाठी जिल्हा उप निबंधकांनी नांदेड येथे सहकार संकुल उभारणीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा, अशी सूचना पाटील यांनी या बैठकीत केली.