मुंबई : कृत्रिम फुलांचे सध्या सर्वत्र पेव फुटले आहे. सनातन देशात फुलांचे महत्व मोठे आहे. प्लास्टिक वापराची मर्यादा ओलंडणारे, पर्यावरण आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या घटकांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. मुंबईत फुलांचा बाजार चालला पाहिजे. पालिका त्यांच्यावर कारवाई करणार असेल तर ती कारवाई थांबवण्याचे आदेश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
लग्न सभारंभ, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात कृत्रिम फुले, प्लास्टिक फुगे, दर्जाहीन खेळणी, यांचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. या वस्तूंचा सर्वच प्राणी, पक्षी, जनावरे यांच्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या वस्तूमध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगामुळे डोकेदुखी, त्वचाविकार, डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास असे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. प्लास्टिक पिशव्यात वापरण्यात येणाऱ्या रंगामुळे कर्करोगांसारख्या आजारांनाही निमंत्रण मिळत असल्याचे आढळून आले आहे.
राज्यातील प्लास्टिक फुले, खेळणी, यांच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी लक्षवेधी भाजपचे विक्रम पाचपुते यांनी मांडली. त्यावर जयंत पाटील, प्रवीण दटके, नमिता मुंदडा, महेश शिंदे या सदस्यांनी उपप्रश्न विचारले. प्लास्टिक फुलांच्या वापरामुळे नैर्सगिक फुले खरेदी केली जात नाहीत. फुल व्यापाऱ्यांचे भाव पडले आहेत. फुल शेतकरी संकटात सापडला आहे. ग्रीन हाऊसच्या उभारणीत कर्ज बाजारी झाली आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होत नाही असे जंयत पाटील यांनी सांगितले.
देशात १२० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरला डिसेंबर २०२२ पासून बंदी आहे. राज्य सरकारने अगोदर जाडीची ही मर्याद ५० मायक्राॅनची ठेवली होती. जैविक विघटन होऊ न शकणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वापराला बंदी असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. घातक रसायन वापरण्यासही बंदी आहे. सुशोभिकरणाच्या अनेक वस्तूंमध्ये रंग वापरला जातो. त्याचा चांगला वाईट परिणाम होत असतो. पर्यावरण विभाग पर्यावरण विषयक प्रश्नांत लक्ष घालते.
राज्य सरकारने ४ हजार १३५ टन प्लास्टिक जप्त केले आहे. कृत्रिम फुलांवर सरसकट बंदी घालता येणार नाही. त्यांची जाडी कमी असेल तर कारवाई होईल. लग्न सभारंभातील फुलांची तपासणी करण्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिसूचना काढून आदेश दिले जातील, असे मुंडे यांनी सांगितले.
