पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश | Playback singer Suhasini Nandgaonkar joins Congress party msr 87 | Loksatta

पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

कलाकारांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठीही काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

ख्यातनाम कवी व माजी आमदार शांताराम नांदगावकर यांच्या स्नुषा आणि खानदेशचे प्रख्यात डॉ. चितळे यांची कन्या पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत दादर येथील टिळक भवन या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी नाना पटोले म्हणाले की, “सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे. काँग्रेसच्या विचाराला माननारे लोक राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. देश तोडण्याचे काम काही पक्ष व संघटना करत असताना देश जोडण्याची भूमिका घेऊन खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ऐतिहासिक पदयात्रा सुरु केली आहे. तोडणाऱ्यांपेक्षा जोडणारे महत्वाचे असतात ही लोकांची भावना आहे. काँग्रेस विचाराने प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.” याचबरोबर सुहासिनी नांदगावकर यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करुन काँग्रेस प्रदेशाध्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

…म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला –

“काँग्रेस हाच सर्व जाती-धर्मांना सामावून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणारा पक्ष आहे. मागास, वंचित, दलित समाजाच्या विकासाचे काम काँग्रेस सरकारनेच केले. परंतु सध्या देशातील परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. दलित, मागास, पीडित समाजाचा विकास व्हायचा असेल, तर काँग्रेस पक्षच करु शकतो याचा विश्वास असल्यानेच मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून, एक कलाकार म्हणून कलाकारांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठीही काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करेन.” अशी गायिका सुहासिनी नांदगावकर यांनी पक्षप्रवेशावेळी प्रतिक्रिया दिली.

३० वर्षांपासून त्या पार्श्वगायन क्षेत्रात कार्यरत –

अशी ही बनवाबनवी, तू सुखकर्ता, गोडी गुलाबी, हिंदी चित्रपट सैनिक, स्टंटमन, छोटा सा घर आदी चित्रपटात त्यांनी गाणी गायली आहेत. ३० वर्षांपासून त्या पार्श्वगायन क्षेत्रात कार्यरत असून देश विदेशातही त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. संगीत शिक्षिका म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 21:27 IST
Next Story
‘आमचाही सरकारी नोकरीमध्ये समावेश करा, अन्यथा मंत्रालयाबाहेर आत्मदहन करेन’; तृतीयपंथीचा राज्य सरकारला इशारा