मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण शुक्रवारी झाले. गुजरात मधील बनासकांठा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात देशातील सुमारे ९.३४ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार ६९० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या बँक खात्यांत १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभाग झाले होते.
केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांना ५० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली किंवा त्यांच्या खर्चात बचत झाली आहे. देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या लहान, अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यांत जमा करण्यात आले आहेत.
जागतिक बाजारात खतांच्या किमती वाढल्यानंतरही केंद्र सरकारने त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू दिला नाही. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुमारे १६ लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या १२ वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून २४ लाख कोटी रुपये देण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई मिळाल्याचेही मोदी यांनी सांगितले.
हवामान सुसंगत तीन हजार बियाणांच्या जाती
बदलत्या हवामानाशी सुसंगत बियाण्यांच्या सुमारे तीन हजार नव्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून, राष्ट्रीय गोकूळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक प्रजननाला चालना दिली आहे. पशूंना लाळ्या-खुरकुत रोगापासून वाचविण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १५० कोटी लस मात्रा देण्यात आल्या असून, ८ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्याचा लाभ झाला आहे. देशातील गाय आणि म्हशींचे प्रति दिन सरासरी दूध उत्पादन २०१३ – १४ मधील पाच लिटरपेक्षा कमी पातळीवरून आता सुमारे आठ लिटरपर्यंत वाढल्याचेही मोदी यांनी नमूद केले.
आता नमो शेतकरी महासन्मानच्या तीन हप्त्यांची प्रतीक्षा
राज्य सरकाने पीएम किसानच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील मार्च महिन्यातील एक आणि आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील जून महिन्याचा, असे दोन हप्ते प्रलंबित आहेत. आता पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर रब्बी हंगामासाठीचा ऑक्टोंबर- नोव्हेंबरच्या हप्त्याससह तीन हप्ते राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी मिळाल्यानंतर नमो शेतकरी महासन्माचा हप्ता राज्य सरकार वितरीत करते.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील केशरी कार्डधारकांना मिळणार थेट निधी
छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत सहभागी न झालेल्या केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी, प्रति महिना १७० रुपये इतक्या रोख रकमेचे हस्तांतरण महाडीबीटी योजनेद्वारे केले जाणार आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा, अशा १४ जिल्ह्यांत योजनेची अंमलबजावणी होणार आहे. शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र शिधापत्रिका धारकांची सद्यस्थिती विभागाकडे उपलब्ध असलेल्या आधार संलग्न क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन (आरसीएमएस) प्रणाली वरील महिती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर महासारथी प्रणालीमार्फत लाभार्थ्यांची माहिती महाडीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ एप्रिल २०२६ पासून वितरीत केला जाणार आहे.
