“भाजपाने असा निर्णय घेतला आहे की, एकनाथ शिंदे गटाला आम्ही समर्थन देणार असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील,” अशी घोषणा दुपारी राजभवनामधील पत्रकार परिषदेत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर पुढे बोलताना आपण या मंत्रीमंडळामध्ये सहभागी होणार नसून बाहेरुन सरकारचं काम सुनियोजित पद्धतीने होत आहे की नाही याकडे लक्ष ठेवणार असून काम सुरळीत चालेल अशी काळजी घेऊ, असंही फडणवीस म्हणाले होते. एकनाथ शिंदे हे एकटेच सायंकाळी साडेसात वाजता शपथ घेतील अशी घोषणाही त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी सात वाजेपर्यंत म्हणजेच शपथविधीच्या अर्धा तास आधीपर्यंत हीच स्थिती असतानाच अचानक दिल्लीमधील शीर्ष नेतृत्वाने वेगळी भूमिका मांडली आणि फडणवीस यांनी पुढील अर्ध्या तासात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनंती केल्याचं ट्विटरवरुन सांगण्यात आलं. मात्र यामागील खरे सुत्रधार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याची माहिती समोर येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये, “आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजपा आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला एक मोठा गट आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याच शपधविधी होईल,” असं सांगितलं होतं.

पाहा व्हिडीओ –

स्वत:च्या भूमिकेबद्दल बोलताना फडणवीस यांनी, “मी सरकारच्या बाहेर राहून काम करणार आहे. हे सरकार नीट काम करेल याची जबाबदारी माझीही असेल,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. “या सरकारला यशस्वी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करु. पंतप्रधान मोदींनी जे विकासपर्व सुरु केलं आहे ते आम्ही राबवू. मागील अडीच वर्षांपासून जो महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागला होता. तो निघेल आणि पुन्हा विकासाची एक्सप्रेस धावू लागेल,” असं फडणवीस म्हणाले. मात्र दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेनंतर अचानक दिल्लीवरुन सूत्र हलली.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना केली. पंतप्रधान मोदींनी दोन वेळा फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचं वृत्त झी न्यूजने दिलं आहे. फडणवीस यांच्याशी मोदींची चर्चा झाल्यानंतरच त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वरवर जरी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व म्हणजे अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची नावं समोर येत असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती स्वीकारुन फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi called devendra fadnavis and ask him to be deputy cm of maharashtra as eknath shinde took oath of cm scsg
First published on: 30-06-2022 at 20:15 IST