pm modi congratulates sunetra pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. यानंतर आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. दरम्यान यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी देखील पोस्ट करत सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले आहे. “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्रीमती सुनेत्रा पवार जी यांचे हार्दिक अभिनंदन. अजित पवार जी आयुष्यभर शेतकऱ्यांचे कल्याण, महिला सक्षमीकरण आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी समर्पित होते. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणार आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती द्याल,” असे शाह म्हणाले आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवडीवेळी दिलीप वळसे-पाटील यांनी गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी देखील पूर्ण झाला आहे.